
दोडामार्ग : सासोली येथील प्रकल्पासंदर्भात काही ग्रामस्थांनी केलेले वृक्षतोड, अवैध उत्खनन आणि पर्यावरणाच्या हानीचे आरोप पूर्णपणे खोटे, बिनबुडाचे व कंपनीची बदनामी करण्याच्या उद्देशाने करण्यात आल्याचा दावा ओरिजिन कंपनीचे कुलअखत्यारपत्रधारक गौरव दत्ताराम बिडये यांनी केलाय. महसूल विभागाची विधिवत परवानगी घेऊनच रस्त्यासाठी आवश्यक सपाटीकरण सुरू असून कोणत्याही प्रकारची वृक्षतोड किंवा मातीची वाहतूक येथे होत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच कंपनीच्या मशीन ऑपरेटरला मारहाण झाल्याचा आरोप करत संबंधितांवर कारवाईची मागणीही त्यांनी केली. इतकंच नव्हे तर काही मोजकेच लोक जाणीवपूर्वक स्वार्थासाठी कंपनीची विनाकारण बदनामीचा प्रयत्न सुरु असल्याचेही बिडये यांनी स्पष्ट केलंय.
बिडये यांनी पत्रकारांशी संवाद साधत कंपनीची सडेतोड भूमिका स्पष्ट केलीय, सासोली येथील सर्व्हे क्रमांक १७० व १७१ मधील सामायिक जमिनीची वहीवाटी प्रमाणे पोट हिस्सा मोजणी होवून जमिनीचे स्वतंत्र सातबारा उतारे व नकाशा उपलब्ध आहेत. या मोजणीस ग्रामस्थांकडून कोणत्याही न्यायलयामध्ये आव्हान देण्यात आलेले नाही. त्यामुळे सदर जमिनीचे नकाशा व सातबारा कायम स्वतंत्र झालेले आहेत. तरी ही काही ग्रामस्थ सामाईक जमीन असल्याचा दावा करून वारंवार आमच्या स्वतंत्र वहीवाटीच्या मिळकती मध्ये ट्रेसपास करीत आहेत, जे बेकायदेशीर आहे. या सर्व्हे क्रमांकातील जमीन सपाटीकरणासाठी महसूल प्रशासनाची रीतसर परवानगी घेण्यात आली असून त्यानुसारच तेथे नियमानुसार काम सुरू आहे.
कामादरम्यान कोणत्याही प्रकारची वृक्षतोड किंवा अवैध उत्खनन करण्यात आलेले नाही. तसेच मातीची कोणतीही वाहतूक सुरू नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. इतकंच नव्हे तर सातत्याने कंपनीला त्रास देण्यासाठी धडपडणारे काही ग्रामस्थ जाणीवपूर्वक दुसऱ्या ठिकाणच्या वादळी पावसामुळे पडलेल्या झाडांचे फोटो वायरल करून ते सासोली मध्ये वृक्षतोड होत असल्याचे जिल्हा प्रशासनास भासवुन कंपनीची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करत असल्याचे बिडये यांनी स्पष्ट केलंय. इतकंच नव्हे तर आरोप कर्त्यांनी कंपनीकडे केलेली आर्थिक मागणी पूर्ण न झाल्यानेच ते लोक कंपनीविरोधात बिनबुडाचे आरोप करत असल्याचा ठाम दावा बिडये यांनी केला आहे.
रविवारी सुद्धा काही ग्रामस्थ कंपनीच्या मालकीच्या जमिनीत घुसले व तेथील मशीन ऑपरेटरला मारहाण केल्याचा आरोप त्यांनी केला. या घटनेमुळे संबंधित ऑपरेटर प्रचंड भयभीत झाला असून सोमवारी तो कामावरही हजर राहिलेला नाही.
आमचा हा प्रकल्प पर्यावरणाला कोणतीही हानी न करता सूरु आहे. उलट "पर्यावरणाच्या सानिध्यात सेकेंड होम" या संकल्पनेवरच हा प्रकल्प असल्याने वृक्षतोड करण्यासचा प्रश्नच उद्भवत नसल्याची महत्वाची बाब त्यांनी अधोरेखित केली. तसेच या प्रकल्पात ये -जा करण्यासाठी रस्त्याचे काम सुरू असल्याने तेथेफक्त रस्ता कामासाठी सपाटीकरण करण्याचे काम सुरू आहे. कोणत्याही प्रकारे माती उत्खनन करून त्याची वाहतूक येथे होत नसल्याने आरोप करणाऱ्या ग्रामस्थांनी कंपनीची नाहक बदनामी थांबवावी असे बिडये यांनी म्हटले आहे.










