
कुडाळ : गेल्या काही दिवसांपासून दडी मारून बसलेल्या पावसाने अखेर कुडाळ तालुक्यात दमदार हजेरी लावली आहे. ‘एल निनो’च्या प्रभावामुळे यंदा पावसाचे आगमन लांबणीवर पडले होते, ज्यामुळे शेतकरी राजा चिंतेत ग्रासला होता. मात्र, आता पावसाने जोरदार पुनरागमन केल्यामुळे तालुक्यात आनंदाचे वातावरण पसरले असून बळीराजा सुखावला आहे. यंदा मान्सूनच्या सुरुवातीला ‘एल निनो’चा मोठा फटका बसला होता. हवामान कोरडे राहिल्याने आणि पावसाने प्रदीर्घ ओढ दिल्याने पेरण्या खोळंबल्या होत्या. जून महिना अर्धा संपत आला तरी समाधानकारक पाऊस न झाल्याने, "यंदा खरीप हंगाम वाया जातो की काय?" अशी भीती कुडाळ तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली होती. पाण्याच्या टंचाईमुळे शेतीकामांना वेग येत नव्हता. अखेर कुडाळ शहर तसेच तालुक्यात ग्रामीण भागात पावसाने जोरदार बँटिंग सुरू केली आहे.
पावसाच्या या दमदार हजेरीमुळे शेतकऱ्यांनी सुटकेचा श्वास घेतला आहे. तालुक्यात आता भातपेरणी, आवळणी आणि लावणीच्या कामांनी चांगलाच वेग घेणार आहे, शेतकरी जोमाने कामाला लागले आहेत. वातावरणात सुखद गारवा आला आहे. या पावसामुळे केवळ शेतीलाच फायदा झाला नसून, गेल्या काही दिवसांपासून जाणवणाऱ्या उकाड्यापासून कुडाळवासीयांची सुटका झाली आहे.










