
कुडाळ : खाजगी इंग्रजी शाळांच्या झगमगाटात आज शासकीय जिल्हा परिषद शाळांची पटसंख्या टिकवणे हे मोठे आव्हान बनले आहे. अशा काळात कुडाळ तालुक्यातील घोटगे ग्रामपंचायतीने संपूर्ण जिल्हाचे लक्ष वेधून घेणारा एक स्तुत्य उपक्रम राबवला आहे. घोटगे गावच्या सरपंच सौ. चैताली ढवळ यांनी जिल्हा परिषद शाळेतील पटसंख्या वाढवण्यासाठी एक अनोखी योजना आणली असून, जे पालक आपल्या पाल्याचा प्रवेश जिल्हा परिषद शाळेत करतील, त्यांच्या घराची संपूर्ण घरपट्टी सरपंच स्वतःच्या खिशातील पैशातून (स्वनिधी) भरणार आहेत. विशेष म्हणजे हा उपक्रम त्यांनी सलग दुसऱ्या वर्षीही यशस्वीपणे सुरू ठेवला आहे.
विकासकामांसोबतच गावाच्या शैक्षणिक प्रगतीचा विचार करणाऱ्या या आगळ्यावेगळ्या सरपंचांचे सर्वत्र कौतुक होत आहे. सामान्यतः लोकप्रतिनिधींकडून गावातील रस्ते, पाणी, वीज अशा पायाभूत सुविधांवर भर दिला जातो. मात्र, घोटगे गावच्या सरपंचांनी गावच्या विकासासोबतच जिल्हा परिषद शाळांचे अस्तित्व टिकवण्याचा विडा उचलला आहे. स्वतःच्या खिशातील पैसा खर्च करून सरकारी शाळेची पटसंख्या वाढवणारे लोकप्रतिनिधी तसे दुर्मिळच. सरपंचांच्या या आवाहनाला गावकऱ्यांनीही मोलाची साद दिली आहे. या योजनेमुळे शाळेच्या पटसंख्येत झालेली घसघशीत वाढ झाली आहे. योजनेच्या पहिल्या वर्षी ४ विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषद शाळेत प्रवेश घेतला होता. या उपक्रमाची महती समजताच चालू शैक्षणिक वर्षात ही प्रवेश संख्या थेट ११ वर पोहोचली आहे.
"गावाचा चौफेर विकास करतानाच आपल्या सरकारी शाळा कशा टिकतील, याचा विचार करणे गरजेचे आहे. शाळेची पटसंख्या वाढवणे हे केवळ शिक्षकांचे काम नसून संपूर्ण गावाचे कर्तव्य आहे, याच भावनेतून मी हा छोटासा प्रयत्न करत आहे. अजून कोणत्याही विद्यार्थ्यांना प्रवेश करायचा असल्यास त्यांनी करावा असे आवाहन त्यांनी केले आहे. सरकारी शाळा वाचवण्यासाठी घोटगे ग्रामपंचायतीने शोधलेली ही अनोखी नामी युक्ती सध्या कुडाळ तालुक्यासह संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरली आहे. एका बाजूला पटसंख्येअभावी जिल्हा परिषद शाळा बंद पडण्याच्या मार्गावर असताना, घोटगे गावाने मात्र लोकसहभाग आणि लोकप्रतिनिधींच्या इच्छेच्या जोरावर या शाळांना संजीवनी दिली आहे.
"घोटगे सरपंचांचा हा आदर्श घेऊन जिल्ह्यातील इतर सरपंच आणि ग्रामपंचायती देखील आपल्या गावातील शाळा वाचवण्यासाठी असे प्रयत्न करणार का?" असा प्रश्न आता शिक्षण क्षेत्रातून विचारला जात आहे. सरपंचांच्या या चौफेर कामगिरीचे आणि अनोख्या दातृत्वाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.










