
सावंतवाडी : दिवाळी म्हटली की डोळ्यांसमोर येते फराळाचे ताट, तिखट-गोड पदार्थ, आणि खमंग पोहे! पण कोकणात दिवाळीच्या पहाटे पोह्यांचा घास घेण्यापूर्वी एक अशी गोष्ट केली जाते, जी ऐकून तुम्ही म्हणाल 'अरेच्या, हे आम्हाला माहीतच नव्हतं.
होय, कोकणात दिवाळीत आवर्जून प्यायला जातो 'सातिवण' म्हणजेच सप्तपर्णीच्या सालीचा रस! पण नेमका कशासाठी असतो हा कडू रस आणि या परंपरेमागे दडलंय काय? या परंपरेची सुरुवात झाली ती आरोग्याच्या एका जुन्या आणि सुंदर विचारातून. दिवाळीत घरात वेगवेगळे फराळाचे पदार्थ, तेलकट-तुपकट खाणं होतं. ऋतू बदलत असतो, अशात सर्दी, खोकला, ताप किंवा पोटाचे आजार बळावण्याची शक्यता असते.
आयुर्वेदानुसार 'सप्तपर्णी' किंवा 'सातिवण'ची साल ही अत्यंत कडू, थंड आणि ज्वरनाशक मानली जाते. जुना ताप, मलेरिया किंवा पोटाच्या तक्रारींवर ही साल रामबाण उपाय आहे. म्हणूनच, दिवाळीच्या फराळावर ताव मारण्यापूर्वी, शरीराची पचनशक्ती उत्तम राहावी, रोगप्रतिकारशक्ती वाढावी आणि ऋतू बदलामुळे येणाऱ्या तापापासून शरीराचं संरक्षण व्हावं, यासाठी पूर्वजांनी ही अनोखी प्रथा सुरू केली.
'आधी कडू, मग गोड' हाच यामागचा साधा आणि आरोग्यदायी मूळ हेतू होता. विशेष म्हणजे, एका देठावर ७ पानं असणाऱ्या या सप्तपर्णीची ओळख आपल्या कोकणात 'सातवीन' म्हणून आहे. पण हो, निसर्गाची ही देणगी जपताना एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा साली काढताना झाडाला जीवघेणी इजा करू नका, कारण झाड वाचलं तरच आपली ही परंपरा टिकेल!
संकलन - स्वप्निल परब मुख्य उपसंपादक, दै. कोकणसाद
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all








