LIVE UPDATES

शिक्षक समितीचे कोकण विभागीय कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर

२६ ऑगस्टला आयोजन
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: August 24, 2026 17:51 PM
views 30  views
#kokansadlive#news update#konkan update#

सिंधुदुर्गनगरी :  महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या कोकण विभागीय कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराचे आयोजन बुधवार, २६ ऑगस्ट रोजी सिंधुदुर्गनगरी (ओरोस) येथील सिंधुदुर्ग जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतपेढीच्या कै. द. सि. सामंत गुरुजी सभागृहात करण्यात आले आहे. सकाळी १०.३० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत होणाऱ्या या शिबिरात कोकण विभागातील प्राथमिक शिक्षक समितीच्या कार्यकर्त्यांना संघटनात्मक चळवळ, शिक्षक व विद्यार्थी प्रश्न तसेच शालेय कामकाजाबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

या शिबिराची माहिती शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष तथा स्वागताध्यक्ष विठ्ठल गवस यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी राज्य कार्यकारिणी सदस्य सचिन मदने व नामदेव जांभवडेकर, जिल्हा सरचिटणीस तुषार आरोसकर, पतपेढी संचालक नारायण नाईक, चंद्रसेन पाताडे, जिल्हा पदाधिकारी आपा सावंत आदी उपस्थित होते.

सिंधुदुर्गसह रत्नागिरी, रायगड, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांतील तालुका, जिल्हा व राज्यस्तरीय पदाधिकारी या प्रशिक्षण शिबिरात सहभागी होणार आहेत. संघटनेतील ज्येष्ठ मार्गदर्शकांच्या माध्यमातून विविध विषयांवर कार्यशाळा व मार्गदर्शन सत्रे घेण्यात येणार आहेत. राज्य सरचिटणीस राजन कोरगावकर आणि कोकण विभागप्रमुख रूपेश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली शिबिराचे नियोजन करण्यात आले आहे.

शिबिराचे उद्घाटन राज्य शिक्षक नेते उदय शिंदे आणि राज्याध्यक्ष विजय कोंबे यांच्या हस्ते होणार आहे. राज्य सरचिटणीस राजन कोरगावकर, राज्य उपाध्यक्ष राजन सावंत, आनंदा कांदळकर, विलास कंटेकुरे, राज्य कार्याध्यक्ष सह्याजी पाटील, राज्य कोषाध्यक्ष नंदकुमार होळकर यांच्यासह राज्य व विभागीय पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

विविध विषयांवर मार्गदर्शन

शिबिरात ‘शासन निर्णय मार्गदर्शन’ या विषयावर विजय कोंबे, ‘संघटनेतील कार्यकर्ता कसा असावा’ या विषयावर गोपाळ सुरे, ‘शिक्षक समिती आणि चळवळ’ या विषयावर उदय शिंदे, तर ‘अशी घडली शिक्षक समिती’ या विषयावर चंद्रकांत अणावकर मार्गदर्शन करणार आहेत. तसेच दिनकर तळवणेकर हे ‘शिक्षक व शालेय कामकाजाबाबत जागृती’ या विषयावर मार्गदर्शन करतील. त्यानंतर संघटनात्मक प्रश्नोत्तर व सुसंवाद आणि समारोप होणार आहे.

सकाळी ९.३० ते १०.३० या वेळेत नावनोंदणी व चहापान, १०.३० ते ११ या वेळेत उद्घाटन सोहळा होईल. त्यानंतर विविध मार्गदर्शन सत्रे आयोजित करण्यात आली आहेत.

कोकण विभागातील सर्व तालुकाध्यक्ष, सचिव, जिल्हाध्यक्ष, जिल्हा सचिव, राज्य कार्यकारिणी पदाधिकारी, महिला आघाडीचे पदाधिकारी व सदस्य यांनी या प्रशिक्षण शिबिरास वेळेत उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.