LIVE UPDATES

आंबोलीतील संगीत साधक विद्यार्थ्यांचा गौरव

Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: August 24, 2026 19:16 PM
views 21  views

सावंतवाडी : भारतीय संगीत विद्यापीठाच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या आंबोलीतील विद्यार्थ्यांचा विशेष गौरव सोहळा शनिवारी येथील योगा आश्रम येथे उत्साहात संपन्न झाला. स्वरधारा संगीत विद्यालय, आंबोली यांच्या वतीने या कार्यक्रमाचे हे आयोजन करण्यात आले होते. 

या परीक्षेत यश संपादन केलेल्या वैदही गावडे, भक्ती मेस्त्री, अभिषेक बुचुडे, आर्यन परब आणि जय राऊळ या विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र प्रदान करून त्यांचे अभिनंदन करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या या यशामागे त्यांची मेहनत, सातत्यपूर्ण सराव तसेच पालक व मार्गदर्शकांचे योगदान असल्याचे उपस्थितांनी सांगितले.

यावेळी स्वरधारा संगीत विद्यालयाचे संचालक  रमेश मेस्त्री, निलेश नागेश गुरव, योगा आश्रमाचे संचालक मच्छिंद्रनाथ बुचुडे, माऊली भजन मंडळाचे शिवराम गावडे, अर्जुन गावडे, रामा गावडे, लाडू नाटलेकर, प्रसाद मेस्त्री, कानू गुरव, डुबाजी राऊत, सुभाष राणे, स्वप्निल जाधव, दर्शन गावडे, शुभम मेस्त्री, रोहित मेस्त्री आदी उपस्थित होते. तसेच सदर विद्यापीठाचे श्रीगुरू तथा संगीत शिक्षक निलेश गुरव व स्वप्निल जाधव यांचा सत्कार करण्यात आला.

यासह आंबोलीतील संगीत व भजन परंपरा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याचे आवाहन कार्यक्रमात करण्यात आले असून जेष्ठांनी जपलेला सांगीतिक वारसा नव्या पिढीने आत्मसात करून ही परंपरा अधिक समृद्ध करावी, अशी भावना व्यक्त करण्यात आली. कार्यक्रमाचे निवेदन प्रसाद गावडे यांनी केले आभार प्रदर्शन निलेश गुरव यांनी केले. विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल उपस्थित मान्यवरांनी त्यांचे कौतुक करून पुढील सांगीतिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.