
सावंतवाडी : पावसाळ्याच्या काळात निसर्गात उगवणाऱ्या औषधी गुणधर्म आणि पौष्टिकतेने युक्त अशा विविध रानभाज्यांची ओळख लोकांना व्हावी, या उदात्त हेतूने सावंतवाडी नगरपरिषदेच्या महिला व बालकल्याण समितीने एक विशेष उपक्रम हाती घेतला आहे. २५ आणि २६ ऑगस्ट रोजी नगरपरिषद कार्यालयाच्या प्रांगणात दोन दिवसीय 'रानभाज्या व गावठी वस्तू महोत्सवा'चे आयोजन करण्यात आले आहे.
सावंतवाडी नगरपरिषद महिला व बालकल्याण समितीच्या सभापती दिपाली दिलीप भालेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने जंगलात अनेक प्रकारच्या रानभाज्या नैसर्गिकरित्या उगवतात. या भाज्या केवळ चविष्टच नसून त्यात अनेक महत्त्वपूर्ण औषधी गुणधर्म आणि पौष्टिकता असते, जी आरोग्यासाठी अत्यंत लाभदायक आहे. मात्र, बदलत्या जीवनशैलीमुळे अनेक नवीन पिढ्यांना या भाज्यांची ओळख नाही. ही दुवा सांधण्यासाठी आणि लोकांमध्ये रानभाज्यांच्या सेवनाबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
दरम्यान, हा महोत्सव २५ ऑगस्ट २०२६ ते २६ ऑगस्ट २०२६ या कालावधीत नगरपरिषद कार्यालयाच्या प्रांगणात सकाळी ८ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत सर्वांसाठी खुला असेल.
या दोन दिवसीय महोत्सवात रानभाज्यांच्या विक्रीसह, गावठी वस्तूंचे प्रदर्शन आणि विक्रीही केली जाणार आहे. महोत्सवाचे अधिकृत उद्घाटन २५ ऑगस्ट रोजी सकाळी १०:०० वाजता सावंतवाडी नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सौ. श्रद्धाराजे सावंत भोसले यांच्या हस्ते होणार आहे.या महत्त्वपूर्ण कार्यक्रमास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन सावंतवाडी नगरपरिषदेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापती सौ. दिपाली दिलीप भालेकर यांच्या वतीने करण्यात आले आहे.










