
सावंतवाडी : ऑप्टिकल वेल्फेअर असोसिएशन, सिंधुदुर्गचा 5 वा वर्धापन दिन सोहळा स्नेहसंमेलन शनिवारी हॉटेल मँगो, सावंतवाडी येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाले. कार्यक्रमाचे उद्घाटन एस. एस. आय वेअर, मुंबईचे सर्वेसर्वा शाम देसाई व असोसिएशनचे अध्यक्ष अनिल सावंत यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले.
यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद सदस्य विक्रांत सावंत, सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी पतसंस्थेचे अध्यक्ष नितीन वाळके, सावंतवाडी तालुका व्यापारी संघटनेचे अध्यक्ष जगदीश मांजरेकर आदी उपस्थित होते. व्यापारी पतसंस्थेचे अध्यक्ष नितीन वाळके यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, ऑनलाईन कंपन्या व नव्या पद्धतीच्या स्पर्धेमुळे पारंपरिक ऑप्टिकल व्यवसायासमोर आव्हान उभे आहे. यावर मात करण्यासाठी सर्व व्यापाऱ्यांनी एकत्र येऊन, नवीन तंत्रज्ञान व सोशल मीडियाचा वापर करून आधुनिक पद्धतीने व्यवसाय करावा.
जिल्हा परिषद सदस्य विक्रांत सावंत यांनी बदलत्या ग्राहकांच्या अपेक्षांनुसार दुकानात बदल करण्याचे आवाहन केले. तर जगदीश मांजरेकर यांनी व्यापारी संघटना तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. कोणतीही अडचण आल्यास आम्ही सर्वतोपरी मदत करू," अशी ग्वाही दिली. कार्यक्रमाचे उद्घाटक शाम देसाई यांनी चष्मा व्यापारातील अडीअडचणींवर प्रकाश टाकला. बदलत्या काळानुसार आपणही बदलणे गरजेचे आहे. ग्राहकांना उत्तम सेवा, दर्जेदार उत्पादने आणि तांत्रिक ज्ञानाच्या आधारेच आपण लेन्सकार्ट सारख्या कंपन्यांना टक्कर देऊ शकतो. या वाटचालीत मी शेवटपर्यंत तुमच्या सोबत आहे," असे ते म्हणाले.
दुपारच्या सत्रात 'यश ऑप्टिकल अँड लेन्स लिमिटेड' मार्फत यांनी ग्लास व फ्रेम डिस्पेंसिंगचे प्रात्यक्षिकासह ट्रेनिंग दिले. तसेच एस.एस.आय वेअरच्या आधुनिक फ्रेम्सचे प्रदर्शनही भरवण्यात आले होते. समारोप प्रसंगी अध्यक्ष अनिल सावंत यांनी सर्व पाहुण्यांचे आभार मानले. या कार्यक्रमास सचिन हरमलकर यांच्यासह जिल्ह्यातील सर्व ऑप्टिकल व्यावसायिक उपस्थित होते. सूत्रसंचालन मंगेश चव्हाण व आभार प्रदर्शन अनिल सावंत यांनी मानले.











