LIVE UPDATES

आमदार निलेश राणेंचा उद्धव ठाकरेंना टोला

भातशेती आणि आंबा-काजू भरपाईसाठी अधिवेशनात आवाज उठवणार
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: June 28, 2026 18:39 PM
views 32  views

कुडाळ : कोकणातील आंबा-काजू उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्यांना सभागृहात न्याय मिळवून दिल्यानंतर आता कोकणातील भातशेती नुकसान भरपाईसाठी देखील अधिवेशनात आक्रमकपणे आवाज उठवणार असल्याची ग्वाही आमदार निलेश राणे यांनी दिली आहे. तसेच, महाविकास आघाडीतील समन्वयावरून त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले. कुडाळ येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना आमदार निलेश राणे यांनी विविध चालू घडामोडींवर आपली भूमिका स्पष्ट केली.

"कोकणातील आंबा-काजू उत्पादक शेतकऱ्यांच्या मागणीला आवाज नव्हता, म्हणूनच मी सभागृहात त्यांची बाजू लावून धरली. सरकारने त्याला तत्काळ मान्यता दिली असून ही रक्कम आली आहे. यानंतर विम्याची रक्कम आणि सरकारची मदतही शेतकऱ्यांना मिळणार आहे. मात्र, हे पैसे नेमके केव्हा जमा होणार? याबाबत उद्या पुरवणी मागण्यांमध्ये सरकारला विचारणार आहे," असे आमदार राणे म्हणाले.

तसेच, उद्या कृषी विभागावर चर्चा होणार असून, ज्या जोमाने आंबा-काजूचा विषय मांडला, त्याच जोमाने कोकणातील भातशेती नुकसान भरपाई संदर्भात सरकारकडे आक्रमक मागणी करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

महाविकास आघाडी टिकवण्यासाठी स्थानिक पातळीवर समन्वय असायला हवा, या उद्धव ठाकरेंच्या विधानाचा समाचार घेताना निलेश राणे म्हणाले, "आता खूप उशीर झाला आहे. तुम्ही आधी नेत्यांना भेटला नाही, समन्वय ठेवला नाही, म्हणूनच आज ही वेळ आली आहे. जर आधीच स्वतःचा पक्ष आणि ताकद टिकवली असती, तर हे दिवस पाहावे लागले नसते. आता उबाठा पक्ष झिरो झाल्यामुळे त्यांना सोबत ठेवायचे की नाही, हे काँग्रेस ठरवणार. अशी पक्षाची परिस्थिती पाहून वाईट वाटते."

"शिवसेनेने सोबत बेइमानी केली," या उद्धव ठाकरेंच्या टीकेला उत्तर देताना ते म्हणाले, "एवढे मोठे नुकसान झाल्यानंतर कोणाचेही मानसिक संतुलन बिघडते. ठाकरे यांना आता सहन होत नसल्यामुळे ते काहीही बोलत राहणार. त्यांनी इतरांवर टीका करण्यापेक्षा लोक आपल्याला सोडून का जात आहेत, याचे आत्मपरीक्षण करावे. संजय राऊत यांच्यासारख्या माणसांमुळे पक्षाचे किती नुकसान झाले, यावर त्यांनी चर्चा करावी." खासदार पक्ष सोडून जाण्यास उद्धव ठाकरे स्वतः कारणीभूत असून, स्वतःच्या चुका दुसऱ्यांवर ढकलू नयेत, असा टोलाही त्यांनी लगावला.

संजय दिना पाटील यांच्या मतदारसंघात राज ठाकरे जाणार असल्याच्या प्रश्नावर बोलताना आमदार राणे म्हणाले, "मी राज ठाकरेंचा आदर करतो, पण मुंबई महानगरपालिका निवडणुकीत त्यांनी पूर्ण मुंबई फिरूनही किती जागा आल्या? मुंबईत आता प्रत्येक पक्षाला आपले स्थान कळले आहे, मनसेलाही ते समजले आहे. त्यामुळे आता फिरून काही उपयोग होणार नाही."

दरम्यान, खासदार श्रीकांत शिंदे यांना केंद्रात मंत्रीपद मिळत असल्याबद्दल आमदार निलेश राणे यांनी त्यांचे अभिनंदन केले. "श्रीकांत शिंदे हे जनतेच्या प्रश्नांवर कायम अभ्यासपूर्ण बोलतात, त्यांचा केंद्रीय मंत्री म्हणून कार्यकाळ अत्यंत यशस्वी राहील," असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

तसेच, आमदार राजेश क्षीरसागर यांच्या व्हायरल व्हिडिओवर बोलताना, अलीकडे अनेक व्हिडिओ एआय (AI) तंत्रज्ञानाचा वापर करून बनवले जात असल्याने, या व्हिडिओची सत्यता तपासली पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले.