LIVE UPDATES

ग्रामरत्न सन्मानाने सरपंच हरिश्चंद्र नाईक सन्मानित

खानयाळे बोडदे गावचा अभिमान उंचावला
Edited by: लवू परब
Published on: May 07, 2026 11:26 AM
views 154  views

दोडामार्ग : ग्रामविकासासाठी सातत्याने कार्यरत राहून गावच्या सर्वांगीण प्रगतीसाठी मोलाचे योगदान देणारे खानयाळे व बोडदे गावच्या ग्रुप ग्रामपंचायतचे सरपंच हरिश्चंद्र गंगाराम नाईक यांना “महाराष्ट्राचे ग्रामरत्न सरपंच पुरस्कार 2025-26” ने सन्मानित करण्यात आल्याने ग्रामवासियांत आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

पंचायत राज विकास संघ संचलित अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या वतीने दिला जाणारा हा मानाचा पुरस्कार पाचगणी (महाबळेश्वर) येथे नुकताच प्रदान करण्यात आला. गावाच्या विकासासाठी नाईक यांनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत या सन्मानासाठी त्यांची निवड करण्यात आली हॊती.

सरपंच हरिश्चंद्र नाईक यांनी आपल्या कार्यकाळात ग्रामविकास, पायाभूत सुविधा, स्वच्छता, जलव्यवस्थापन तसेच सामाजिक ऐक्य या क्षेत्रांत उल्लेखनीय पुढाकार घेतला आहे. त्यांच्या नेतृत्वामुळे ग्रामपंचायतीत विकासकामांना गती मिळाली असून गावकऱ्यांमध्ये एकजूट आणि प्रगतीची भावना अधिक दृढ झाली आहे.

या यशाबद्दल विविध स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, ग्रामस्थ, सहकारी आणि मित्रपरिवाराने त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. हा सन्मान स्विकारल्या नंतर सरपंच शेटये यांनी “हा सन्मान केवळ माझा नसून संपूर्ण गावाचा आहे,” अशी भावना व्यक्त करत पुढील काळातही गावाच्या विकासासाठी अधिक जोमाने कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केलाय .

या गौरवामुळे खानयाळे - बोडदे गावासह दोडामार्ग तालुक्याचे नाव राज्यभर उज्ज्वल झाले असून, इतर गावांसाठीही हा आदर्श ठरणार असल्याचे मत व्यक्त होत आहे.