
देवगड : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते, शिक्षणप्रेमी व मूळ देवगड-मिठमुंबरी येथील सखाराम शिवराम तथा एस. एस. मुंबरकर (८०, सध्या रा. विक्रोळी- मुंबई) यांचे शुक्रवारी रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास ठाणे येथील ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान निधन झाले. ते एस. एस. मास्तर म्हणूनही सुपरिचित होते.
एस. एस. मुंबरकर यांनी मुंबई महानगरपालिकेमध्ये चतुर्थ श्रेणी कर्मचारी ते वर्ग-१ च्या अधिकारी पदापर्यंत अतिशय प्रामाणिक सेवा बजावली होती. सेवानिवृत्तीनंतर त्यांनी विविध सामाजिक संघटनांवर काम केले. आंबेडकरी चळवळीतील अनेक संघटनांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग होता. शैक्षणिक क्षेत्रातही त्यांचे अमूल्य योगदान राहिले आहे. सर्वोदय शिक्षण संस्था, देवगडचे ते अध्यक्ष होते. सिंधुदुर्ग जिल्हा बौद्ध सेवा संघाचे ते माजी अध्यक्ष, तर मिठमुंबरी आनंद विकास मंडळाचे ते ज्येष्ठ सल्लागार होते. चळवळीची ओळख करून देणारे ते खंबीर आधारस्तंभहोते. त्यांच्या निधनामुळे आंबेडकरी विचारांच्या चळवळीची मोठी हानी झाल्याची भावना व्यक्त होत आहे. पश्चात पत्नी, मुलगा, विवाहित मुली, सुना, जावई, नातवंडे, भाऊ, वहिनी असा मोठा परिवार आहे.











