LIVE UPDATES

आडाळी उत्खननामागे मोठी राजकीय शक्ती : रूपेश राऊळ

आम. केसरकरांवर आरोप ; संजू परबांना टोला
Edited by: विनायक गांवस
Published on: May 30, 2026 15:44 PM
views 32  views

सावंतवाडी : आडाळी प्रकल्पातील खनिज सदृश्य माती चोरीस गेल्याचे उघड झाले असून जवळपास कोट्यावधी रुपयांची उलाढाल संगनमताने करण्यात आली आहे. असे प्रकार ही जनतेची क्रूर चेष्टा आहे. यातून येथील शासन काय करत ? हा  सवाल निर्माण होतो. जिल्हाप्रमुख संजू परब यांनी या प्रकरणात आवाज उठवला आहे. मात्र, फक्त तहसीलदार आणि पोलीस निरीक्षक हे एवढे मोठे प्रकरण करू शकत नाही. उत्खनन वाहतूक ते नेऊन विकणं यामागे फक्त प्रशासन नाही मोठी राजकीय शक्ती आहे. परब हे कदाचित आमदार दीपक केसरकर यांचे नाव घेण्यास घाबरले असतील असा टोला उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे विधानसभा प्रमुख रूपेश राऊळ यांनी हाणला. 

दोडामार्ग तालुक्यातील आडाळी एमआयडीसी येथील करोडो रुपयांच्या खनिज सदृश्य माती चोरीप्रकरणाचे प्रमुख सूत्रधार या मतदारसंघाचे आमदार दिपक केसरकर हेच आहेत. त्यांच्याच मर्जीने असले प्रकार होत आहेत असा आरोप श्री. राऊळ यांनी केला. सावंतवाडी, दोडामार्ग तालुक्यात मोठ्या प्रमाणावर अवैध धंदे होत असल्याचे खुद्द त्यांच्याच पक्षाचे आमदार निलेश राणे सांगत आहेत. मात्र, या प्रकरणातील नाव घेण्यास जिल्हाप्रमुख संजू परब घाबरत असतील. माती चोरी प्रकरणाशी केसरकर यांचा थेट संबंध असून त्यांची व एमआयडीसी अधिकारी यांची पहिली नार्को टेस्ट करा, संपूर्ण सत्य बाहेर येईल असा टोला लगावला. या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन दोषींवर कडक कारवाई न झाल्यास उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या वतीने प्रशासनाच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा उबाठा ठाकरे शिवसेना पक्षाचे सावंतवाडी विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ यांनी दिला. यावेळी तालुकाप्रमुख राजू शेटकर, विलास गावडे, प्रशांत कुबडे विनोद ठाकूर आदी उपस्थित होते.