
नगरसेवक मंदार शिरसाट भडकले !
कुडाळ : शासकीय कार्यालयांच्या नाकाखाली काय चालते, याचे जळजळीत उदाहरण कुडाळमध्ये समोर आले आहे. तहसीलदार कार्यालयाच्या अगदी बाजूला आणि एमआयडीसी रस्त्याशेजारी असलेल्या शासकीय मैदानाची दारुड्यांनी अक्षरशः वाट लावली आहे. ज्या मैदानावर लहान मुले आपल्या भविष्याचे, क्रिकेटचे धडे गिरवण्यासाठी येतात, ते मैदान आता 'बेवड्यांचा सुरक्षित अड्डा' बनले आहे. शनिवार आणि रविवारी खेळायला येणाऱ्या निष्पाप मुलांना मैदानात पडलेल्या बियर आणि दारूच्या फुटलेल्या बाटल्यांचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. धक्कादायक आणि संतापजनक बाब म्हणजे, प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे मुलांनी खेळताना याच दारूच्या बाटल्यांचा वापर 'बाउंड्री लाईन' म्हणून केल्याचे विदारक चित्र पाहायला मिळाले. खेळाडूंच्या पायाला काच लागून एखादी गंभीर दुर्घटना घडल्यास याला जबाबदार कोण? असा संतप्त सवाल आता पालकांमधून उपस्थित होत आहे.
या गंभीर परिस्थितीवर कुडाळचे नगरसेवक मंदार शिरसाट यांनी पोलीस प्रशासनाचे वाभाडे काढले आहेत. अत्यंत कडक शब्दांत टीका करताना ते म्हणाले, "पोलीस प्रशासन या गंभीर प्रकाराकडे जाणीवपूर्वक कानाडोळा का करत आहे? कुडाळ शहरात सीसीटीव्ही कॅमेरे नसल्यामुळे चोऱ्यांचे प्रमाण आधीच वाढले आहे. आता पोलिसांना जाग येण्यासाठी मैदानावर एखादा मोठा गुन्हा घडण्याची वाट पाहिली जात आहे का?" हे मैदान मुलांसाठी आहे की दारुड्यांसाठी, असा सवाल करत शिरसाट यांनी इशारा दिला की, "जर येत्या काही दिवसांत या मैदानावर कारवाई झाली नाही आणि दारुड्यांचा बंदोबस्त केला नाही, तर थेट पोलीस ठाण्यात 'ठिय्या आंदोलन' छेडण्यात येईल."
या मैदानाच्या दुरवस्थेवर बोलताना राजन नाईक यांनी तीव्र खंत व्यक्त केली. "कुडाळमधील लहान मुलांना खेळण्यासाठी जागा नव्हती, ती माजी आमदार वैभव नाईक यांच्या प्रयत्नांतून उपलब्ध करून देण्यात आली होती. या मैदानावरील अंधार दूर करण्यासाठी लाईट मंजूर झाली आहे, मग ती अजून का बसवली नाही?" असा सवाल त्यांनी केला. तसेच, पोलिसांनी रोज संध्याकाळी मैदानावर गस्त (पेट्रोलिंग) घालून खुलेआम दारू पिणाऱ्यांना पोलिसांचा धाक दाखवला पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.
मैदानावरील अंधाराचा गैरफायदा घेऊन रात्रीच्या वेळी डंपर चालक या ठिकाणी गाड्या थांबवून दारू पितात, असा खळबळजनक आरोप संतोष शिरसाट यांनी केला आहे. अंधारात चालणारे हे काळे धंदे रोखण्यासाठी मैदानावर तात्काळ हायमॅस्ट लाईट आणि सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे अनिवार्य आहे. आज केवळ दारू पिऊन बाटल्या टाकल्या जात आहेत, उद्या याच मैदानात एखादा अघटित किंवा गंभीर गुन्हा घडू शकतो, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.
खाकीचा वचक संपला का? तहसीलदार कार्यालयाच्या शेजारीच रात्रीच्या वेळी दारूच्या पार्ट्या करण्याची हिंमत बेवड्यांमध्ये येतेच कशी? खेळताना एखाद्या चिमुरड्याला काच लागून मोठी दुखापत झाली, तर त्याचे दायित्व कोण घेणार का? मैदानाची लाईट मंजूर होऊनही अद्याप मैदान अंधारात का ठेवले गेले आहे? असे सवाल उपस्थित होत आहे.
कुडाळमधील खेळाडूंचे भविष्य घडवणाऱ्या या शासकीय मैदानाचा ताबा दारुड्यांनी घेतला आहे. लोकप्रतिनिधींनी आता आंदोलनाचा पवित्रा घेतल्यामुळे पोलीस प्रशासन आणि स्थानिक प्रशासन आतातरी जागे होणार का याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.










