LIVE UPDATES

श्री. भगवान महादेव सांबरे मोफत रुग्णालयाचा ०१ जूनला प्रथम वर्धापन दिन सोहळा

सुरेश प्रभूंच्या जीवनावर 'ध्येयधुंद' पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीचे होणार प्रकाशन
Edited by: विनायाक गांवस
Published on: May 30, 2026 20:32 PM
views 23  views

सिंधुदुर्ग : 'संकल्प नव कोकणाचा' हे ब्रीद घेऊन सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या 'जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था, महाराष्ट्रच्यावतीने येत्या सोमवार, दिनांक ०१ जून २०२६  रोजी 'श्री. भगवान महादेव सांबरे मोफत रुग्णालय, रत्नागिरी' चा प्रथम वर्धापन दिन मोठ्या उत्साहात संपन्न होत आहे. यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत संस्थेच्या केंद्रातून शासकीय सेवेत निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान तसेच ॲड. नकुल पार्सेकर लिखीत सुरेश प्रभू यांच्या जीवनावर आधारित 'ध्येयधुंद' या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन करण्यात येणार आहे. 

जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून रत्नागिरीत चालवल्या जाणाऱ्या 'मोफत स्पर्धा परीक्षा केंद्र' आणि 'मोफत पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण केंद्र' या उपक्रमांना मोठे यश आले आहे. या केंद्रांच्या माध्यमातून अभ्यास करून शासकीय सेवेत आणि पोलीस दलात निवड झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा विशेष सन्मान सोहळा या कार्यक्रमात पार पडणार आहे. या सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून भारताचे माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू उपस्थित राहणार आहेत. तसेच विशेष अतिथी म्हणून मानव साधन विकास संस्थेच्या अध्यक्षा सौ. उमा सुरेश प्रभू आणि विशेष निमंत्रित म्हणून डॉ. अमेय देसाई उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. याच कार्यक्रमाचे औचित्य साधून अॅड. श्री. नकुल पार्सेकर लिखित आणि सुरेशजी प्रभू यांच्या प्रेरणादायी जीवनावर आधारित 'ध्येयधुंद' या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीचा प्रकाशन सोहळा संपन्न होणार आहे. या पुस्तकाचे प्रकाशक रजनीश राणे (स्वामीराज प्रकाशन) आणि संजय शहा (श्री वर्धमान श्रृतगंगा ट्रस्ट) हे आहेत. मंगळवार आठवडा बाजार मैदान, आय.टी.आय. समोर, नाचणे रोड, ता. जि. रत्नागिरी या ठिकाणी हा सोहळा होणार असून या भव्य सोहळ्याला रत्नागिरीतील नागरिकांनी, युवक-युवतींनी आणि हितचिंतकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन 'जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था, महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष निलेश सांबरे' यांच्यावतीने करण्यात आले आहे.