LIVE UPDATES

बंदर जेटी परिसरातील पारंपारिक मार्ग स्थानिक वाहतुकीसाठी खुला ठेवा

आम. निलेश राणेंचे बंदर विभागाला निर्देश
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: October 10, 2026 19:37 PM
views 27  views

मालवण : मालवण बंदर जेटी परिसरातील वाहनतळ जागेत गेट घालून बंद करण्यात आलेले पारंपारिक मार्ग खुले करावे या मागणीसाठी आज स्थानिक मत्स्य व्यावसायिक, वाहतूक व्यावसायिक व पर्यटन व्यवसायिकांनी आमदार निलेश राणे यांचे लक्ष वेधले. यावेळी आम. निलेश राणे यांनी बंदर जेटी परिसराची पाहणी करत बंदर जेटीचा पारंपारिक मार्ग स्थानिक वाहतुकीसाठी खुला ठेवावा तसेच या मार्गांवरून वाहतूक करणाऱ्या स्थानिकांना कोणतेही शुल्क आकारू नये, त्यासाठी ठेक्यामध्ये आवश्यक सुधारणा कराव्यात, असे निर्देश आम. राणे यांनी बंदर विभागाच्या अधिकाऱ्यांना देत याची अंमलबजावणी तात्काळ करावी असे सांगितले. 

मालवण बंदर जेटी परिसरातील वाहनतळ जागेत गेट घालून पारंपारिक मार्ग बंद करण्यात आल्याने तसेच वाहनतळ ठेकेदाराकडून स्थानिकांना पार्किंग शुल्क आकारले जात असल्याने स्थानिक व्यावसायिक व नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते. या पार्श्वभूमीवर स्थानिक मत्स्य व्यावसायिक, वाहतूक व्यावसायिक व पर्यटन व्यावसायिक यांनी दोन दिवसापूर्वी मालवण बंदर निरीक्षक रजनीकांत पाटील यांची भेट घेऊन लक्ष वेधले होते. मात्र याबाबत कोणतीही कार्यवाही न झाल्याने व्यवसायिकानी आज मालवणात आलेल्या आमदार निलेश राणे यांचे लक्ष वेधले. आम. राणे यांनी बंदर जेटी येथे दाखल होत पाहणी करून सदर विषय जाणून घेतला. 

यावेळी मालवण मच्छिमार सोसायटीचे अध्यक्ष विकी चोपडेकर, नगरपालिकेच्या महिला व बालकल्याण सभापती तथा पर्यटन व्यावसायिक सौ. अन्वेषा आचरेकर, मत्स्य व्यावसायिक विली डिसोजा, हॉटेल व्यावसायिक संतोष शिरगांवकर, बाबा मुकादम यांनी आम. राणे यांच्या समोर समस्या मांडल्या.

वाहनतळ जागेला लागून असलेले मार्ग हे वाहतूकीचे पारंपारिक मार्ग असून ते गेट लावून बंद करण्यात आले आहेत. यामुळे मत्स्य व्यावसायिक, पर्यटन व्यावसायिक व व्यापारी यांची गैरसोय होत आहे. हे मार्ग खुले करण्यात यावेत. तसेच बंदर जेटी रस्ता ते वाहनतळ मार्गांवरून वाहतूक करणाऱ्या स्थानिकांना वाहनतळ ठेकेदाराकडून शुल्क आकारले जात आहे. सदर मार्ग पारंपारिक मार्ग असल्याने शुल्क आकारणे अन्यायकारक आहे त्यामुळे हे स्थानिकांकडून शुल्क घेणे बंद करावे अशा मागण्या यावेळी आम. राणे यांच्याकडे करण्यात आल्या.

यावेळी व्यवसायिकांचे म्हणणे जाणून घेतल्यावर आम. राणे यांनी बंदर निरीक्षक रजनीकांत पाटील यांच्याशी चर्चा केली. बंदर जेटीचा मार्ग हा वर्षानुवर्षे वापरात असून तेथे अडवणूक करता येणार नाही, संपूर्ण बंदर जेटी परिसर तुम्ही कसा काय वाहनतळ ठेक्यात घेता, स्थानिक मच्छिमार, मत्स्य व्यावसायिक, वाहतूकदार यांना हा मार्ग खुला राहिला पाहिजे, वाहतुकीचा व स्थानिकांचा विचार होणे आवश्यक आहे, स्थानिक वाहतूकदारांकडून कोणतेही शुल्क घेऊ नये, त्यानुसार वाहनतळ ठेक्यात आवश्यक बदल करावेत, असे यावेळी आम. राणे यांनी बंदर निरीक्षकांना सांगितले. तसेच गेट घालून बंद करण्यात आलेल्या मार्गापैकी बाजाराकडील व सागर किनारा हॉटेल कडील मार्ग खुला करून वाहनतळ ते बंदर जेटी रस्ता असा मार्ग आखून तो स्थानिक वाहतुकीसाठी खुला ठेवावा, असे निर्देश आम. राणे यांनी बंदर निरीक्षकांना दिले.

आम. निलेश राणे यांनी या प्रश्नी लक्ष घालत आवश्यक सूचना बंदर विभागाला दिल्याने स्थानिक व्यवसायिक व नागरिकांमधून समाधान व्यक्त करण्यात आले. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, उपनेते संजय आंग्रे, उपनगराध्यक्ष दीपक पाटकर, नगरसेविका मेघा सावंत, बाबा परब, मनोज मेथर, हेमंत शिरगांवकर, परेश धुरी, हर्षल बांदेकर, मयु पारकर, रोहन आचरेकर, आदी तसेच मत्स्य व्यावसायिक, पर्यटन व्यावसायिक व व्यापारी उपस्थित होते.