
देवगड : तालुक्यातील कातवणेश्वर येथील मे. सुखकर्ता कृषी सेवा केंद्रावर कृषी विभागाने केलेल्या धडक कारवाईत तब्बल ५५ लाख १० हजार रुपये किमतीचा विनापरवाना कीटकनाशक साठा जप्त करण्यात आला आहे. परवानाधारक जागेव्यतिरिक्त अन्य ठिकाणी साठवून ठेवलेला सुमारे ६.५ मेट्रिक टन कीटकनाशकांचा साठा जप्त करण्यात आला असून, याप्रकरणी राहुल राजेश जोईल (रा. कातवण, ता. देवगड) यांच्याविरोधात देवगड पोलीस ठाण्यात कीटकनाशके कायदा १९६८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दि. २८ नोव्हेंबर २०२६ रोजी कृषी अधिकारी (गुणनियंत्रण) मानसी पवार या नियमित तपासणीसाठी कातवणेश्वर येथील मे. सुखकर्ता कृषी सेवा केंद्रात गेल्या होत्या. यावेळी तपासणीदरम्यान परवानाधारक परिसराव्यतिरिक्त अन्य ठिकाणी कीटकनाशकांचा साठा विनापरवाना करून ठेवल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. या गंभीर प्रकाराची माहिती मिळताच त्यांनी जिल्हा भरारी पथकाला पाचारण केले. त्यानंतर पथकाने घटनास्थळी पंचनामा करून अंदाजे ५५.१० लाख रुपये किमतीचा ६.५ मेट्रिक टन कीटकनाशक साठा जप्त केला. या प्रकरणी कृषी अधिकारी मानसी पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राहुल राजेश जोईल यांच्याविरोधात देवगड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
कृषी विभागाच्या पथकाची कारवाई
ही कारवाई जिल्हा परिषद सिंधुदुर्गचे मोहीम अधिकारी राहुल माने, तालुका कृषी अधिकारी आरती पाटील, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक सुशांत भोसले आणि कृषी अधिकारी (गुणनियंत्रण) मानसी पवार यांच्या पथकाने केली.
महाराष्ट्र राज्याचे संचालक (निवगुनि) सुनील बोरकर, कोकण विभागाचे विभागीय कृषी सहसंचालक शिवाजी आमले, मुख्य गुणवत्ता नियंत्रण अधिकारी प्रवीण देशमुख, सिंधुदुर्गच्या जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री नाईकनवरे, कृषी विकास अधिकारी दिशांत कोळग आणि कोकण विभागाचे तंत्र अधिकारी (गुणनियंत्रण) अजिंक्य पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. पालकमंत्री नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात बोगस खते, औषधे आणि कीटकनाशकांच्या विक्रीविरोधात कृषी विभागाने तपासणी व कारवाईची मोहीम सुरू केली आहे. शेतकऱ्यांची फसवणूक रोखणे आणि त्यांना दर्जेदार कृषी निविष्ठा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने अशा कारवायांना महत्त्व प्राप्त झाले आहे.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all








