
देवगड : प्रशासकीय कामकाजाचा निपटारा जलद गतीने व्हावा आणि नागरिकांची सोय व्हावी, यासाठी देवगड तालुक्यातील जामसंडे या मोठ्या महसुली गावाचे विभाजन करून ‘कट्टा’ हे नवीन महसुली गाव निर्माण करण्याबाबत जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी प्रारूप अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६ मधील तरतुदींनुसार ही अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली असून, नागरिकांना हरकती व सूचना सादर करण्यासाठी ३ नोव्हेंबर २०२६ पर्यंत मुदत देण्यात आली आहे.
जामसंडे गावात ४८५, तर कट्टा गावात ५४ भूमापन क्रमांक
प्रस्तावित विभाजनानुसार, मूळ जामसंडे महसुली गावामध्ये एकूण ४८५ भूमापन क्रमांक राहणार आहेत. यामध्ये सर्वे क्रमांक १ ते ५६, ५८, ५९, ६६ ते १११, १५५ ते ५१६, ५१८ ते ५२७, ५३०, ५३१ आणि ५३३ ते ५३९ यांचा समावेश आहे.
तर जामसंडे गावातून ५४ भूमापन क्रमांक वेगळे करून ‘कट्टा’ हे नवीन महसुली गाव निर्माण करण्याचा प्रस्ताव आहे. यामध्ये सर्वे क्रमांक ५७, ६० ते ६५, ११२ ते १५४, ५१७, ५२८, ५२९ आणि ५३२ यांचा समावेश असेल.
३ नोव्हेंबरपर्यंत हरकती व सूचना सादर करा
या प्रस्तावित विभाजनामुळे ज्या नागरिकांवर किंवा हितसंबंधितांवर परिणाम होणार आहे, त्यांना आपली बाजू मांडण्याची संधी देण्यात आली आहे. संबंधित नागरिकांनी आपल्या लेखी हरकती व सूचना ३ नोव्हेंबर २०२६ पर्यंत तहसीलदार, देवगड किंवा उपविभागीय अधिकारी, कणकवली यांच्या कार्यालयात सादर कराव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.
निर्धारित मुदतीनंतर प्राप्त होणाऱ्या हरकती व सूचनांचा विचार केला जाणार नसल्याचे प्रारूप अधिसूचनेत नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे प्रस्तावित नवीन महसुली गावाच्या निर्मितीबाबत काही आक्षेप किंवा सूचना असल्यास संबंधितांनी मुदतीत लेखी स्वरूपात नोंदविणे आवश्यक आहे.











