
कणकवली : गणेशोत्सवानिमित्त सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या संख्येने चाकरमानी आणि गणेशभक्त रेल्वेने दाखल होत आहेत. कणकवली रेल्वे स्थानकावर उतरलेल्या काही प्रवाशांना मात्र आपल्या घरच्या ठिकाणी जाण्यासाठी रिक्षा मिळत नसल्याचा प्रकार रविवारी दुपारी समोर आला. रिक्षाचालकांकडून भाडे नाकारले जात असल्याने संतप्त प्रवाशांनी थेट उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे धाव घेतली .
रविवारी दुपारी सुमारे दीड वाजण्याच्या सुमारास काही प्रवासी कणकवली रेल्वे स्थानकात उतरले. त्यातील एका महिला प्रवाशांनी रिक्षाचालकांना आपल्या घरचा पत्ता सांगून जाण्यासाठी रिक्षा चालकांना विनंती केली. मात्र एक दीड तास रिक्षाचालक रिक्षा थांबवत नसल्याचे तसेच भाडे नाकारत असल्याचे प्रवाशांनी सांगितले.
यानंतर प्रवाशांनी थेट आरटीओ अधिकाऱ्यांकडे तक्रार केली. तक्रारीची दखल घेत आरटीओ अधिकाऱ्यांनी रिक्षाचालकांना नियमानुसार योग्य भाडे आकारावे, प्रवाशांना भाडे नाकारू नये, अशा सूचना दिल्या. तसेच संबंधित प्रवाशांना रिक्षा उपलब्ध करून देण्यात आली.
गणेशोत्सवाच्या काळात कणकवली रेल्वे स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी होत असताना रिक्षाचालकांकडून भाडे नाकारले जाणार नाही, यासाठी परिवहन विभागाकडून लक्ष ठेवण्यात येत आहे.
यावेळी मोटर वाहन निरीक्षक एन. व्ही. ठोंबरे, सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक अमोल दांडेकर आणि एस. व्ही. स्वामी उपस्थित होते. कणकवली, कुडाळ, सावंतवाडी तसेच महामार्गावरील रिक्षा वाहतुकीवरही परिवहन विभागाकडून लक्ष ठेवण्यात येत आहे.










