
कणकवली : गोव्याहून राजस्थानला आयशर टेम्पोमधून सुरु असलेली दारू वाहतूक खारेपाटण चेकपोस्ट येथील कणकवली पोलिसांच्या पथकाने रोखली. शुक्रवारी पहाटे ४ वा. सुमारास केलेल्या या कारवाईत तब्बल ४८ लाखांची दारू जप्त करण्यात आली. सोबतच २० लाख रुपये किमतीचा आयशर टेम्पोही जप्त करण्यात आला आहे. याबाबत दारू वाहतूक करणारे हर्जीराम मुलाराम गोदारा (२४) व मुकेश खिमाराम पंडित (२९, दोन्ही रा. राजस्थान) यांच्यावर गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कॉन्स्टेबल सुनील निकम, उद्देश कदम, होमगार्ड गोपाळ लोके हे खारेपाटण चेकपोस्ट येथे ड्युटीस होते. पहाटे ४ वा. सुमारास तेथे दाखल आयशर टेम्पो (जीजे२३ एडब्ल्यू५२१९) पथकाने थांबविला. पाहणी केली असता टेम्पोच्या हौद्यात काही गोण्या दिसल्या. मात्र, पुढील बाजूस पुठ्ठ्यांचे बॉक्स व त्यामध्ये गोवा बनावटीची दारू आढळून आली.
घटनेची माहिती समजताच पोलीस निरीक्षक तेजस नलवडे, पोलीस उपनिरीक्षक महेश शेडगे, हवालदार वेंगुर्लेकर, कॉन्स्टेबल सचिन माने आदी देखील घटनास्थळी दाखल झाले. जप्त टेम्पो व वरील दोन्ही संशयितांना कणकवली पोलीस ठाण्यिात नेण्यात आले. ही दारू वाहतूक विक्रीच्या उद्देशाने सुरु असल्याचे संशयितांनी कबुल केले आहे. याबाबत कॉन्सेटेबल सुनील निकम यांच्या फिर्यादीवरून संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.










