
मालवण : ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार आरोग्यसेवा मोफत उपलब्ध व्हावी, या उद्देशाने भारतीय जनता पार्टी मालवण तालुका आणि भाजप मालवण तालुका उपाध्यक्ष राजन आंबेरकर यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, ११ ऑक्टोबर २०२६ रोजी आंबेरी येथे भव्य मोफत महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
आंबेरी येथे सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत हे शिबिर होणार असून, विविध आजारांवरील तज्ज्ञ डॉक्टरांकडून रुग्णांची तपासणी व मार्गदर्शन करण्यात येणार आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना एकाच ठिकाणी विविध आरोग्यविषयक सेवा मिळाव्यात, तसेच गरजू रुग्णांना आवश्यक औषधे मोफत उपलब्ध व्हावीत, यासाठी हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे.
या शिबिरात दंतचिकित्सा, त्वचारोग, नेत्ररोग, स्त्रीरोग, बालरोग, अस्थिरोग तसेच जनरल मेडिसिन आदी विभागातील तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करण्यात येणार आहे. दात व हिरड्यांचे आजार, त्वचारोग व ॲलर्जी, डोळ्यांची तपासणी तसेच मोतीबिंदू शस्त्रक्रियेबाबत मार्गदर्शन, महिलांची व गरोदर मातांची तपासणी, बालरोग, सांधेदुखी, गुडघेदुखी, मान व कंबरदुखी यांसह विविध आजारांबाबत तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन मिळणार आहे.
तपासणीनंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आवश्यक असलेली औषधे रुग्णांना जागेवरच मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
"आपले आरोग्य, आपली जबाबदारी" हा संदेश घेऊन आयोजित करण्यात आलेल्या या महाआरोग्य शिबिराचा आंबेरी व परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन भाजप मालवण तालुका उपाध्यक्ष राजन आंबेरकर यांनी केले आहे.










