
देवगड : जामसंडे-वळकुवाडी येथील गोगटे घर ते ठाकूर घरापर्यंतच्या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून, त्यामुळे ग्रामस्थ व वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या खड्ड्यांमुळे अपघाताचा धोका निर्माण झाला असून, गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर या रस्त्यावरील खड्डे तातडीने बुजवावेत, अशी मागणी देवगड-जामसंडे नगरपंचायतीचे स्वीकृत नगरसेवक सुधीर लवू तांबे यांनी केली आहे.
याबाबत त्यांनी २८ ऑगस्ट रोजी नगरपंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांना लेखी निवेदन दिले आहे. जामसंडे-वळकुवाडी परिसरातील गोगटे घर ते ठाकूर घरापर्यंतच्या रस्त्याची सध्या मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी मोठे खड्डे पडल्याने वाहनचालकांना वाहने चालवताना कसरत करावी लागत असून, नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
येत्या काही दिवसांत गणेश चतुर्थी उत्सव सुरू होणार असून, या काळात परिसरात नागरिक तसेच वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ वाढणार आहे. त्यामुळे संभाव्य अपघात टाळण्यासाठी गणेशोत्सवापूर्वीच रस्त्यावरील सर्व खड्डे बुजवून रस्ता वाहतुकीसाठी सुरक्षित व सुस्थितीत करावा, अशी मागणी तांबे यांनी निवेदनातून केली आहे.
नगरपंचायतीने या मागणीची तातडीने दखल घेऊन संबंधित विभागामार्फत रस्त्याची पाहणी करून आवश्यक दुरुस्तीची कार्यवाही करावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे.










