
सावंतवाडी : मोती तलाव परिसरात नागरिकांच्या सुरक्षेसाठी अतिरिक्त सुरक्षा उपाययोजना करण्याबाबत शिवसेना महिला नगरसेविकांनी मुख्याधिकारी यांचे लक्ष वेधले. शहरातील तलाव परिसरात नागरिक, पर्यटक, ज्येष्ठ नागरिक तसेच लहान मुले मोठ्या संख्येने येत असतात. तलावाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सध्या उपलब्ध उपाययोजना अपुऱ्या असल्याने अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. त्यादृष्टीने उपाययोजना करण्याबाबत मागणी केली.
या निवेदनात म्हटले आहे की,तलावात एखादी व्यक्ती चुकून पडल्यास तिला स्वतःहून बाहेर येणे कठीण होऊ शकते. त्यामुळे नागरिकांच्या जीवित सुरक्षेच्या दृष्टीने खालील उपाययोजना तातडीने करण्यात याव्यात. तलावाभोवती मजबूत गॅल्वनाइज्ड/स्टेनलेस स्टील सुरक्षा जाळी व संरक्षक फेन्सिंग बसविण्यात यावे. तलावाच्या आतील बाजूस ठराविक अंतरावर आपत्कालीन वापरासाठी स्टीलच्या शिड्या बसविण्यात याव्यात.तलाव परिसरात लाईफ बॉय, लाईफ जॅकेट व मजबूत दोरीची व्यवस्था करण्यात यावी.
पाण्यात पडलेल्या व्यक्तीस आधार मिळावा यासाठी तरंगती सुरक्षा दोरी बसविण्यात यावी.आपत्कालीन बचाव कार्यासाठी काही ठिकाणी सुरक्षित पायऱ्या किंवा रेस्क्यू प्लॅटफॉर्म तयार करण्यात यावेत. तलाव परिसरात “धोकादायक खोल पाणी”, “सावधान” इत्यादी सूचना फलक लावण्यात यावेत. परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे व पुरेशी प्रकाश व्यवस्था करण्यात यावी.
आपत्कालीन संपर्क क्रमांक व मदत केंद्राची माहिती दर्शविणारे फलक उभारण्यात यावेत.सुरक्षा उपाययोजनांची नियमित तपासणी व देखभाल करण्यासाठी जबाबदार यंत्रणा नियुक्त करण्यात यावी.या उपाययोजना राबविल्यास तलाव परिसर अधिक सुरक्षित होऊन संभाव्य अपघात टाळण्यास मदत होईल. नागरिकांच्या हिताच्या दृष्टीने या मागणीचा सकारात्मक विचार करून आवश्यक कार्यवाही करावी, अशी मागणी नगरसेविका ॲड. निता सावंत कविटकर यांनी केली. यावेळी नगरसेविका शर्वरी धारगळकर, सौ.स्नेह नाईक, सौ सुप्रिता धारणकर, सौ भारती परब आदी उपस्थित होते.










