LIVE UPDATES

बनावट सह्या प्रकरणाचा तपास वेगात

जिल्हा परिषद बांधकाम विभाग पोलिसांच्या रडारवर
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: June 18, 2026 21:20 PM
views 87  views

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागातील बनावट सह्या प्रकरणाचा तपास आता अधिक वेगाने सुरू असून, पाच ठेकेदारांविरोधात गुन्हा दाखल केल्यानंतर सिंधुदुर्गनगरी पोलिसांनी आपले लक्ष थेट बांधकाम विभागाकडे वळविले आहे. या प्रकरणातील महत्त्वाची कागदपत्रे पोलिसांनी जिल्हा परिषद प्रशासनाकडे मागविली असून, ती उपलब्ध करून देण्यासाठी बांधकाम विभागात हालचालींना वेग आला आहे.

कार्यकारी अभियंता राजेंद्र सावंत यांच्या बनावट सह्या करून एकूण १३ बिले मंजुरीसाठी सादर करण्यात आल्याचे उघड झाले होते. याप्रकरणी सावंत यांनी दोन दिवसांपूर्वी सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी पाच ठेकेदारांविरोधात गुन्हा नोंदवून तपासाची सूत्रे हाती घेतली आहेत.

तपासाचा भाग म्हणून पोलिसांनी संबंधित सर्व बिलांची मूळ कागदपत्रे, मंजुरी प्रक्रिया आणि विभागीय नोंदी मागविल्या आहेत. गुरुवारी दिवसभर जिल्हा परिषद बांधकाम विभागात या कागदपत्रांची जमवाजमव सुरू होती. मात्र, सायंकाळपर्यंत ही कागदपत्रे पोलिसांकडे सुपूर्द झालेली नव्हती, अशी माहिती मिळाली.

या प्रकरणाचा तपास सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शेखर लव्हे करीत आहेत. तपासादरम्यान अनेक महत्त्वाचे प्रश्न उपस्थित झाले आहेत. मंजुरीसाठी कार्यालयात आलेली बिले ठेकेदारांच्या हाती कशी पोहोचली? कार्यकारी अभियंत्यांच्या नावाचे शिक्के कोणी उपलब्ध करून दिले? तसेच कार्यकारी अभियंत्यांच्या संगणकावरील अधिकृत आयडीचा वापर नेमका कोणी केला? या सर्व बाबींचा पोलिसांकडून कसून शोध घेतला जात आहे.

विशेष म्हणजे, बनावट सह्या करण्यात आलेल्या १३ बिलांपैकी तीन बिले विविध विकासकामांशी संबंधित असून उर्वरित दहा बिले अनामत रकमेच्या परताव्याशी संबंधित आहेत. त्यामुळे या संपूर्ण प्रकारामागे केवळ ठेकेदार नसून विभागातील एखाद्या अधिकारी किंवा कर्मचाऱ्याची मदत असण्याची शक्यता पोलिसांकडून तपासली जात आहे.

दरम्यान, पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर हे संपूर्ण प्रकरण त्यांच्या नियंत्रणाखाली आले असून, संबंधित कागदपत्रांच्या आधारे तपासाची दिशा अधिक स्पष्ट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. बांधकाम विभागातील अंतर्गत संगनमत, अधिकृत प्रणालीचा गैरवापर आणि बनावट सह्यांच्या माध्यमातून शासकीय निधी मिळविण्याचा प्रयत्न यामागील सत्य उघड करण्यासाठी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरविली आहेत.

चौकशीची व्याप्ती वाढण्याची शक्यता


प्राथमिक तपासात समोर आलेल्या बाबींमुळे या प्रकरणात आणखी काही अधिकारी, कर्मचारी किंवा संबंधित व्यक्तींची चौकशी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. कागदपत्रांची छाननी पूर्ण झाल्यानंतर तपासाला नवे वळण मिळण्याची शक्यता असून जिल्हा परिषद वर्तुळात या प्रकरणाचा काही जणांनी धसका घेतल्याची चर्चा सुरु आहे.