
दोडामार्ग : वन्यप्राण्यांकडून शेती व फळबागांचे होणारे नुकसान, नुकसानभरपाई देण्यास होणारी दिरंगाई यांसह विविध मागण्यांसाठी बांबर्डे येथील दौलत राणे, मदन राणे आणि सिद्धेश राणे यांनी बुधवार सकाळपासून दोडामार्ग वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयासमोर पुकारलेले बेमुदत उपोषण तिसऱ्या दिवशी सुरु असून प्रशासनाने मात्र याकडे पाठ फिरवील्याने शेतकऱ्यांनी सत्ताधारी व प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त केली.
बांबर्डे येथील शेतकऱ्यांनी विविध मागण्यांसाठी वनविभाग कार्यालयासमोर हे बेमुदत उपोषण सुरु केले आहे. या उपोषणात शेतकऱ्यांनी विविध मागण्या समोर घेऊन वनविभाग व अधिकाऱ्यांना फैलावर घेतले आहे. आज उपोषणाचा तिसरा दिवस आणि सत्ताधारी व प्रशासनाने या उपोषणाकडे पूर्णपणे पाठ फिरवील्याचे उपोषणकर्त्यांनी म्हणत सत्ताधारी व प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त करत संताप व्यक्त केला.
तुम्हाला सोयर सुतक नसेल तर तुमचे वन्य प्राणी घेऊन चला...
दरम्यान सांतप्त झालेल्या उपोषणकर्त्यांनी दै. कोकणसादशी बोलताना म्हटले की, आमच्या मागण्यांसाठी सत्ताधारी व प्रशासनाला कोणतेही सोयर सुतक नाही. असे असेल तर तुमचे प्राणी तुम्ही घेऊन चला. आमच्या खाजगी जागेत येऊ देऊ नका असे उपोषणकर्ते मदन राणे, संजय गवस म्हणाले.
आता आर या पार..
आज उपोषणाचा तिसरा दिवस असून आम्हा शेतकऱ्यांचा प्रशासनाला काहीही फरक पडत नाही असे एकंदरीत निदर्शनास येत आहे. त्यामुळे आता आर या पारची भूमिका घ्यावी लागेल असेही उपोषणकर्ते म्हणाले.









