LIVE UPDATES

कुडाळमध्ये वादळी पावसाचा तडाखा

पिंगुळीत झाड कोसळले : भातशेतीचे नुकसान
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: October 23, 2026 08:42 PM
views 104  views

कुडाळ : कुडाळ शहरासह तालुक्यात शुक्रवारी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह जोरदार वादळी पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. कुडाळ - वेंगुर्ले मार्गावरील पिंगुळी म्हापसेकर तिठ्यानजीक सुरूचे मोठे झाड रस्त्यावर कोसळल्याने वाहतूक काही काळ विस्कळीत झाली.

झाडाचा काही भाग राजन पुरलकर यांच्या रस्त्यालगत असलेल्या चहाच्या टपरीवर पडल्याने टपरीचे नुकसान झाले. तसेच वीजवाहिन्या तुटल्याने परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला. सुदैवाने त्यावेळी रस्त्यावर वाहनांची किंवा नागरिकांची वर्दळ नसल्याने मोठा अनर्थ टळला. यावेळी मदत कार्यासाठी जिल्हा परिषद सदस्य गुरु सडवेलकर, ग्रामपंचायत सदस्य मंगेश चव्हाण, व्यापारी संघटना उपाध्यक्ष दिपक गावडे, बाबल गावडे, पोलिस पाटील सतीश माडये, शंकर सातार्डेकर, विपुल प्रभु, केदार रासम, रोहनपरब, शायर खान, पोलिस कर्मचारी श्याम भगत, प्रकाश गावडे, संतोष गावड,  स्थानिक नागरिक व संबंधित यंत्रणांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य करीत झाड बाजूला हटविले.

सध्या भातकापणी हंगाम सुरू असून ग्रामीण भागात भातकापणी केली जात आहे. या वादळी वाऱ्यासह पावसाने बहुतांशी ठिकाणी उभे भातपीक जमीनीवर आडवे झाले तर कापणी करून वाळत घातलेले भातपिकही पावसात भिजले. त्यामुळे ऐन कापणी हंगामात पाऊस दाखल झाल्याने शेतकऱ्यांसमोर संकट उभे राहीले आहे.