LIVE UPDATES

मराठी शाळांची गुणवत्ता वाढवा

शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांचे सिंधुदुर्गात प्रतिपादन
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: October 07, 2026 18:21 PM
views 40  views
#kokansadlive#news update#konkan update#

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्याने शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय काम केले असून विविध शैक्षणिक निकषांमध्ये जिल्हा आघाडीवर आहे. मात्र, पालकांमध्ये इंग्रजी माध्यमाच्या शाळांचे वाढते आकर्षण ही वस्तुस्थिती स्वीकारून मराठी तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील शिक्षणाची गुणवत्ता आणखी उंचावण्यावर भर देणे आवश्यक आहे. इंग्रजी माध्यमाच्या शाळांची संख्या किंवा त्यांचे आकर्षण कमी करण्याऐवजी आपल्या शाळांची गुणवत्ता कशी वाढविता येईल, यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे, असे प्रतिपादन शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी केले.

 चला शाळेत जाऊया अभियानाच्या शुभारंभ सिंधुनीती नियोजन समिती सभागृहात शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अपूर्वा बासूर, उपाध्यक्ष दादा साईल, सभापती प्रितेश राऊळ, संतोष साटविलकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी शीतल पुंड, डाएट प्राचार्य डॉ. संदीप पवार आदी उपस्थित होते.

सिंधुदुर्ग येथे आयोजित कार्यक्रमात बोलताना मंत्री भुसे यांनी जिल्ह्याच्या शैक्षणिक प्रगतीचे कौतुक केले. विद्यार्थ्यांना चांगले संस्कार, गुणवत्तापूर्ण आणि आनंददायी शिक्षण मिळणे ही शिक्षण विभागाची जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले.

विद्यार्थ्यांच्या यशामागे शिक्षकांचे मार्गदर्शन तसेच आई-वडिलांचे संस्कार आणि प्रोत्साहन महत्त्वाचे असते. विविध क्षेत्रांत यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचे त्यांनी जिल्ह्यातील नागरिकांच्या वतीने अभिनंदन केले. सिंधुदुर्ग जिल्ह्याने शिक्षण क्षेत्रात केलेल्या कामाबद्दलही त्यांनी समाधान व्यक्त केले.

सर्व शाळांचा विचार आवश्यक

शिक्षणाचा विषय केवळ जिल्हा परिषद किंवा नगरपालिका शाळांपुरता मर्यादित नाही. जिल्ह्यातील अनुदानित, स्वयंअर्थसहाय्यित, अल्पसंख्याक तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी सर्व घटकांनी सामूहिक जबाबदारीने काम केले पाहिजे, असे भुसे यांनी स्पष्ट केले.

शाळांमध्ये केवळ अध्यापनाची गुणवत्ता नव्हे, तर विद्यार्थ्यांवर चांगले संस्कार होणे आणि त्यांना आवश्यक भौतिक सुविधा उपलब्ध होणेही तितकेच महत्त्वाचे आहे. विद्यार्थ्यांना प्राथमिक स्तरापासून गुणवत्तापूर्ण, आनंददायी आणि संस्कारक्षम शिक्षण देणे हे शिक्षण विभागाचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांबाबत सकारात्मक वातावरण निर्माण करा

पालकांमध्ये इंग्रजी माध्यमाच्या शाळांचे आकर्षण वाढत असल्याचे नमूद करताना भुसे म्हणाले की, इंग्रजी माध्यमाच्या शाळांकडे जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कमी करण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आणि मराठी माध्यमाच्या शाळांची गुणवत्ता वाढविणे गरजेचे आहे.

आज समाजातील अनेक मान्यवर व्यक्ती स्थानिक स्वराज्य संस्थांच्या किंवा मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये शिकून पुढे आल्या आहेत. प्रशासकीय सेवेत कार्यरत असलेल्या अनेक अधिकाऱ्यांनीही अशाच शाळांमधून शिक्षण घेतले आहे, असे उदाहरण देत त्यांनी स्थानिक शाळांच्या शिक्षणपद्धतीवर विश्वास निर्माण करण्याची गरज व्यक्त केली.

सिंधुदुर्गला शिक्षणाचे मार्गदर्शक केंद्र बनवूया

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षण विभागातील अधिकारी, शिक्षक आणि नागरिक यांनी शिक्षणाकडे सातत्याने लक्ष दिल्यास जिल्हा आणखी उंची गाठू शकतो. काही महत्त्वाच्या बाबींवर केंद्रित पद्धतीने काम केल्यास महाराष्ट्रासाठी सिंधुदुर्ग हे शिक्षण क्षेत्रातील मार्गदर्शक केंद्र ठरू शकते, असा विश्वास दादा भुसे यांनी व्यक्त केला.

यावेळी जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रातील कामकाजाचे सादरीकरण करण्यात आले. शिक्षण विभागाच्या उपक्रमांना सहकार्य करणाऱ्या सर्व लोकप्रतिनिधींचे आणि संबंधित यंत्रणांचे त्यांनी आभार मानले. भविष्यात शिक्षणाच्या गुणवत्तावाढीसाठी अधिक प्रभावीपणे काम करण्याचे आवाहनही त्यांनी केले.