
दोडामार्ग : घोटगेवाडी येथील कॉजवेवरून तिलारी नदीत वाहून गेलेल्या अनुरंजन किसपोट्टा यांचा ४८ तासांनंतरही शोध लागलेला नाही. बुधवारी सह्याद्री ॲडवेंचर रेस्क्यू पथकातील सांगेली-आंबोलीच्या जवानांनी घोटगेवाडी ते कुडासेपर्यंत नदीपात्रात शोधमोहीम राबवली. नदीकाठ आणि आसपासच्या भागातही शोध घेण्यात आला. मात्र, दिवसभर शोध घेऊनही अनुरंजन यांचा ठावठिकाणा लागला नाही. अंधार झाल्याने सायंकाळी शोधमोहीम थांबवण्यात आली.
सोमवारी सायंकाळी घोटगेवाडी येथील कॉजवेवरून चिमुकल्यासह एक युवक तिलारी नदीच्या पाण्यात वाहून गेला होता. घटनेनंतर प्रशासन आणि बचाव पथकाने शोध सुरू केला. मंगळवारी सुमारे २१ तासांच्या शोधानंतर घोटगे येथील पुलाखाली चिमुकल्याचा मृतदेह सापडला. मृतदेह नदीतून बाहेर काढून शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला. मात्र, अनुरंजन यांचा शोध अद्याप लागलेला नाही.
मंगळवारी अंधार झाल्याने शोधकार्य थांबवण्यात आले होते. बुधवारी सकाळी पुन्हा शोध सुरू करण्यात आला. घोटगेवाडीपासून कुडासेपर्यंत नदीपात्रातील वेगवेगळ्या ठिकाणी जवानांनी तपासणी केली. नदीचा प्रवाह वेगवान असल्याने बचाव पथकाला अडचणी येत आहेत.
अनुरंजन यांचा शोध घेण्यात अडथळे
बेपत्ता दोघांचा शोध घेणे सोपे जावे म्हणून तिलारी मुख्य धरण आणि तेरवण-मेढे बंधाऱ्यातून होणारा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात आला होता. मात्र, धरणातील पाणीसाठा वाढल्याने मंगळवारी सायंकाळी ६.१५ वाजता १०० घनमीटर प्रतिसेकंद पाण्याचा विसर्ग करण्यात आला. तिलारी पाटबंधारे प्रकल्पाचे उपकार्यकारी अभियंता गजानन बुचडे यांनी ही माहिती दिली. पाण्याचा विसर्ग सुरू झाल्याने नदीचा प्रवाह वाढला आहे. त्यामुळे अनुरंजन यांचा शोध घेण्याच्या कामात अडथळे येण्याची शक्यता आहे.
शोध सुरू ठेवण्याची मागणी
अनुरंजन यांचा शोध लागेपर्यंत प्रशासनाने शोधमोहीम सुरू ठेवावी, अशी मागणी नदीकाठच्या ग्रामस्थांनी केली आहे. दुर्घटनेतील दोन्ही व्यक्ती परप्रांतीय असल्या तरी त्यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे बेपत्ता व्यक्तीचा शोध लागेपर्यंत बचावकार्य थांबवू नये, अशी ग्रामस्थांची मागणी आहे.










