
रत्नागिरी : गणेशोत्सवाला आता फक्त एक दिवस शिल्लक असताना जिल्ह्यातील बाजारपेठा गणरायाच्या स्वागतासाठी सज्ज झाल्या आहेत. मुंबई, पुणे तसेच अन्य शहरांमध्ये नोकरी-व्यवसायानिमित्त गेलेले चाकरमानी मोठ्या संख्येने गावाकडे परतू लागले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील बाजारपेठांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
रत्नागिरीसह चिपळूण, दापोली, राजापूर, गुहागर आणि लोटे परशुराम आदी शहरांमध्ये गणेशोत्सवाच्या खरेदीसाठी नागरिकांची गर्दी होत आहे; मात्र, विविध वस्तूंमधील वाढलेल्या दरांमुळे यंदा गणेशभक्तांच्या खिशाला महागाईचा फटका बसत आहे.
गणेशोत्सवासाठी लागणारे पूजेचे साहित्य, सजावटीची वस्तू, फुले, फळे, मिठाई, कपडे आणि विद्युत रोषणाईच्या साहित्याला मोठी मागणी आहे. मखर, तारामंडळा, रंगीबेरंगी विद्युतमाला, लटकन आणि विविध शोभेच्या वस्तूंनी दुकाने सजली आहेत.
घरगुती गणपतीसाठी सजावटीची तयारी सुरू असून, सार्वजनिक गणेश मंडळांकडूनही मंडप आणि देखाव्यांसाठी विविध साहित्याची खरेदी केली जात आहे. त्यामुळे सकाळपासून रात्रीपर्यंत बाजारपेठांमध्ये ग्राहकांची गर्दी पाहायला मिळत आहे. गणेशोत्सवातील पूजाविधीसाठी आवश्यक असलेले कापूर, धूप, अत्तर, कापूस, हळदकुंकू, अबीर, गुलाल, रांगोळी, लाल कापड, जानवी जोड, अक्षता आणि फुलांच्या मागणीत वाढ झाली आहे.
विक्रेत्यांच्या म्हणण्यानुसार, मागील वर्षाच्या तुलनेत काही पूजेच्या साहित्याच्या दरात १५ ते २० टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. इंधन आणि वाहतूक खर्च वाढल्याने त्याचा परिणाम वस्तूंच्या किंमतीवर झाल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. दर वाढले असले तरी गणेशोत्सवासाठी आवश्यक असलेल्या वस्तूंची खरेदी टाळता येत नसल्याने ग्राहकांकडून बजेट सांभाळून खरेदी केली जात आहे.
गणेशोत्सवाच्या निमित्ताने नवीन कपडे खरेदी करण्याची परंपरा असल्याने कापड दुकानांमध्येही गर्दी वाढली आहे. महिला, पुरुष आणि लहान मुलांसाठी साड्या, कुर्ते, फेटे तसेच विविध पारंपरिक पोषाखांना मागणी आहे. सराफा बाजारातही सणसुदीच्या खरेदीमुळे ग्राहकांची गर्दी वाढली आहे. फुलांच्या बाजारात हार, दुर्वा आणि विविध फुलांची मागणी वाढली असून, फळबाजारातही गणेशोत्सवासाठी आवश्यक असलेल्या फळांची आवक वाढू लागली आहे.











