
देवगड : प्रधानमंत्री आवास योजनेत दुबार लाभ घेण्यात आल्याचा गंभीर आरोप करत मिठमुंबरी येथील विजय शांताराम तोडणकर यांनी पंचायत समिती देवगडचे गटविकास अधिकारी यांना निवेदन सादर केले असून संबंधित प्रकरणाची चौकशी करून तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे. अन्यथा १० जून २०२६ पासून पंचायत समिती कार्यालयासमोर उपोषणास बसण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
गटविकास अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात विजय तोडणकर यांनी म्हटले आहे की, मौजे मिठमुंबरी येथील श्री. बाबू रामचंद्र तोडणकर यांच्या नावावरील घर क्रमांक ४१५ हे सन २०१४ पासून अस्तित्वात आहे. तसेच हे घर इंदिरा आवास योजनेअंतर्गत बांधण्यात आले असून त्या घरात सन २०१४ पासून वास्तव्यास असल्याची माहिती माहिती अधिकारांतर्गत ग्रामपंचायत मिठमुंबरी यांच्याकडून प्राप्त झालेल्या कागदपत्रांतून स्पष्ट होत असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
निवेदनात पुढे नमूद करण्यात आले आहे की, सद्यस्थितीत प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत श्री. बाबू रामचंद्र तोडणकर यांना पुन्हा घर मंजूर करण्यात आले असून पात्र लाभार्थ्यांच्या यादीत त्यांचे नाव समाविष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे एका व्यक्तीला शासकीय गृहनिर्माण योजनेचा दुबार लाभ मिळत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
यासंदर्भात संबंधित लाभार्थ्याचे नाव पात्र यादीतून वगळून योग्य ती चौकशी व कारवाई तात्काळ करण्यात यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. अन्यथा प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्यास १० जून २०२६ पासून पंचायत समिती देवगड येथे उपोषणास बसणार असल्याचे विजय तोडणकर यांनी निवेदनात स्पष्ट केले आहे.
या निवेदनाच्या प्रती पंचायत समिती देवगडचे सभापती व उपसभापती यांनाही माहितीस्तव देण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता पंचायत समिती प्रशासन या तक्रारीची कोणत्या पद्धतीने दखल घेते आणि संबंधित प्रकरणाची चौकशी करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.











