
सिंधुदुर्गनगरी : आचरा समुद्रकिनारी बुडणाऱ्या पर्यटकाचे प्राण वाचविण्यात दोन सागरी होमगार्डना यश आले. नितेश विजय गुरव आणि अनिकेत सुभाष परब यांनी प्रसंगावधान राखत स्वतःच्या जीवाची पर्वा न करता समुद्रात धाव घेत संबंधित व्यक्तीला सुखरूप बाहेर काढले. त्यांच्या या धाडसी आणि कर्तव्यनिष्ठ कामगिरीचे कौतुक होत असून, पोलीस अधीक्षक डॉ मोहन पाटील हस्ते त्यांचा बुधवारी (१४ ऑक्टोंबर) पोलीस अधीक्षक कार्यालयात सन्मान करण्यात आला. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक नयोमी साटम उपस्थित होत्या.
मुंबईहून पर्यटनासाठी आलेली एक व्यक्ती १३ ऑक्टोबर रोजी आचरा समुद्रकिनारी समुद्राच्या प्रवाहात अडकून बुडू लागली. ही बाब सागरी सुरक्षा कर्तव्यावर असलेल्या होमगार्ड नितेश गुरव आणि अनिकेत परब यांच्या लक्षात आली. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता समुद्रात धाव घेतली. अथक प्रयत्नांनी संबंधित व्यक्तीला समुद्राच्या प्रवाहातून सुखरूप बाहेर काढून तिचे प्राण वाचविले.
विशेष पोलीस महानिरीक्षक, सागरी सुरक्षा व सुरक्षा, राज्य गुप्तवार्ता विभाग यांच्या पुढाकाराने १० जून २०२६ पासून जिल्ह्यात ६० सागरी होमगार्ड कार्यरत आहेत. प्रत्येक सागरी पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात दहा होमगार्ड नियुक्त करण्यात आले आहेत. किनारपट्टीवर गस्त घालणे, संशयास्पद बोटी व व्यक्तींवर लक्ष ठेवणे, मच्छिमारांकडून गोपनीय माहिती संकलित करणे आणि आपत्कालीन परिस्थितीत बचावकार्य करणे, अशी त्यांची प्रमुख कर्तव्ये आहेत.
गुरव हे २०१९ पासून, तर परब हे २०२४ पासून होमगार्ड म्हणून सेवा बजावत आहेत. दोघेही सध्या कणकवली होमगार्ड पथकात कार्यरत आहेत. त्यांच्या धाडसातून कर्तव्यनिष्ठा, तत्परता आणि मानवतावादी दृष्टिकोनाचे दर्शन घडले आहे.
धाडसी होमगार्ड
नितेश विजय गुरव — होमगार्ड सेवेत २०१९ पासून.
अनिकेत सुभाष परब — होमगार्ड सेवेत २०२४ पासून.
दोघेही कणकवली होमगार्ड पथकात कार्यरत.
सागरी होमगार्डची कर्तव्ये
किनारपट्टीवर गस्त, संशयास्पद हालचालींवर लक्ष, मच्छिमारांकडून गोपनीय माहिती संकलन आणि आपत्कालीन परिस्थितीत बचावकार्य ही सागरी होमगार्डची प्रमुख कर्तव्ये आहेत.
पोलीस अधीक्षकांकडून सन्मान
समुद्रात बुडणाऱ्या पर्यटकाचे प्राण वाचविणाऱ्या दोन्ही होमगार्डचा त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षकांच्या हस्ते यथोचित सन्मान करण्यात आला.













