
वैभववाडी : संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जिल्ह्यात जलसंवर्धनाची मोहीम वेगाने राबविण्यात येत आहे. या मोहिमेला प्रोत्साहन देण्यासाठी जिल्हाधिकारी तृप्ती धोंडमिसे आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अपूर्वा बासूर यांनी नाधवडे-व्हेळकरवाडी येथील गोठणा नदीपात्रात उभारण्यात आलेल्या वनराई बंधाऱ्याच्या कामात प्रत्यक्ष सहभागी होत श्रमदान केले.
नाधवडे येथील व्हेळकरवाडी परिसरात आज (ता. १४) ग्रामस्थांच्या सहभागातून गोठणा नदीवर वनराई बंधारा बांधण्यात आला. जिल्ह्यात पावसाचे प्रमाण कमी झाल्याने पाणीसाठा वाढविण्यासाठी विविध उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. यामध्ये वनराई बंधारे उभारण्यावर विशेष भर देण्यात येत आहे.
प्रशासकीय अधिकाऱ्यांनी स्वतः श्रमदानात सहभागी होत ग्रामस्थांचा उत्साह वाढविला.यावेळी उपविभागीय अधिकारी जगदीश कातकर, तहसीलदार सूर्यकांत पाटील, गटविकास अधिकारी प्रमेश वाघ, जिल्हा परिषद सदस्य प्रमोद रावराणे व श्रावणी रावराणे, पंचायत समिती सभापती सिद्धेश रावराणे, उपसभापती साची कोलते, पंचायत समिती सदस्य साधना नकाशे व देवानंद पालांडे, सहाय्यक गटविकास अधिकारी स्नेहा माने, तालुका कृषी अधिकारी निरंजन देशमुख, सरपंच लीना पांचाळ, ग्रामसेवक रवींद्र गोसावी आणि तलाठी केदारी बागल उपस्थित होते.
दरम्यान, जिल्हाधिकारी धोंडमिसे यांनी उमाळा येथील नैसर्गिक झऱ्याचीही पाहणी केली. परिसरातील नागरिकांसाठी हा झरा वर्षभर पिण्याच्या पाण्याचा महत्त्वाचा स्रोत आहे. त्यामुळे त्याचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली. यावर जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित विषयावर बैठक घेऊन नैसर्गिक झऱ्याचे संवर्धन व सुशोभीकरण तसेच परिसरातील रस्त्याच्या सुधारणेसाठी आवश्यक उपाययोजनांबाबत चर्चा करण्यात येईल, असे सांगितले.












