
वैभववाडी : शेतीपूरक उद्योगांच्या माध्यमातून स्थानिक अर्थव्यवस्थेला बळकटी मिळण्याबरोबरच शेतकऱ्यांना उत्पन्नाचे नवे साधन उपलब्ध होऊ शकते. त्यामुळे कृषीआधारित उद्योग उभारण्यासाठी शेतकरी आणि उद्योजकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तृप्ती धोंडमिसे यांनी केले.
यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अपूर्वा बासूर, तहसीलदार सूर्यकांत पाटील, जिल्हा परिषद सदस्य प्रमोद रावराणे, सुधीर नकाशे, तालुका कृषी अधिकारी निरंजन देशमुख, महेश गोखले, गटविकास अधिकारी प्रमेश वाघ, श्रावणी रावराणे, साची कोलते, साधना नकाशे आदी उपस्थित होते.
जलसंवर्धन आणि संभाव्य पाणीटंचाईच्या अनुषंगाने आढावा घेण्यासाठी वैभववाडी दौऱ्यावर आलेल्या जिल्हाधिकारी धोंडमिसे यांनी नाधवडे येथील गूळ उत्पादन प्रकल्पाला भेट दिली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिला गूळ उद्योग प्रकल्प म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या प्रकल्पातील उत्पादन प्रक्रियेची त्यांनी माहिती घेतली.
ऊसापासून गूळ तयार करण्यापर्यंतच्या विविध टप्प्यांची माहिती घेताना त्यांनी प्रत्यक्ष कामाचा अनुभवही घेतला. ऊसाची मोळी तयार करण्यापासून ते गुऱ्हाळातील गूळनिर्मितीच्या प्रक्रियेपर्यंतची कामे त्यांनी जवळून पाहिली. प्रकल्पाचे कामकाज, गूळनिर्मितीची पद्धत आणि उत्पादन प्रक्रियेतील विविध बाबी समजून घेतल्या.
स्थानिक पातळीवर उपलब्ध असलेल्या कृषी संसाधनांचा योग्य वापर करून उत्पादननिर्मितीला चालना देणे आवश्यक आहे. अशा प्रकल्पांमुळे स्थानिक स्तरावर उद्योगवाढीला संधी निर्माण होऊ शकते. त्यामुळे शेतकरी आणि उद्योजकांनी कृषीआधारित उद्योग उभारण्यासाठी प्रयत्न करावेत, असेही जिल्हाधिकारी धोंडमिसे यांनी सांगितले.












