
वैभववाडी : तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशीही अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. रविवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसानंतर सोमवारी सायंकाळी पाचच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह पुन्हा धुवांधार पावसाला सुरुवात झाली. अचानक कोसळलेल्या या पावसामुळे भातकापणीच्या कामात व्यस्त असलेल्या शेतकऱ्यांची चांगलीच धांदल उडाली. कापणी केलेले भातपीक सुरक्षित ठेवण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरू झाली आहे.
तालुक्यात आज सकाळपासून थोडं ढगाळ वातावरण होतं.तसेच उष्णताही वाढली होती.अखेर सायंकाळी पाच वाजता वीजांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली. सध्या भातकापणीची कामे वेगाने सुरू आहेत. अनेक ठिकाणी भात कापून ठेवण्यात आले असून काही शेतांमध्ये कापणीची कामे अंतिम टप्प्यात आहेत. अशा परिस्थितीत झालेल्या मुसळधार पावसामुळे कापणीच्या कामांना व्यत्यय आला आहे. अनेक ठिकाणी शेतात कापून ठेवलेले भात भिजले आहे.
दरम्यान, या पावसामुळे तालुक्यातील पाणीटंचाईच्या प्रश्नाला काही प्रमाणात दिलासा मिळण्याची शक्यता आहे.या पावसामुळे भूजल पातळीत वाढ होण्यास मदत होऊ शकते. विहिरी, विंधन विहिरी तसेच नैसर्गिक जलस्रोतांच्या पाणीपातळीत काही प्रमाणात वाढ होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
एकीकडे पाणीटंचाईच्या दृष्टीने हा पाऊस दिलासादायक ठरत असला, तरी दुसरीकडे भातकापणीच्या हंगामात त्याने शेतकऱ्यांची चिंता वाढवली आहे. पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास भातपिकाच्या कापणीच्या आणि शेतीच्या पुढील कामांवर परिणाम होण्याची शक्यता आहे.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all








