
सावंतवाडी : येथील प्रतिष्ठित 'भंडारी समाज ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेच्या' रिक्त झालेल्या अध्यक्ष पदाची निवडणूक नुकतीच उत्साहात पार पडली. या निवडणुकीत संस्थेच्या अध्यक्षपदी गुरुनाथ शंकर पेडणेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
माजी अध्यक्ष गुरुदास पेडणेकर यांनी राजीनामा दिल्याने संस्थेच्या रिक्त झालेल्या अध्यक्ष पदाच्या निवडीसाठी सावंतवाडी येथील कळसुलकर इंग्लिश स्कूल जवळील 'दीपदर्शन अपार्टमेंट'मधील संस्था कार्यालयात संचालक मंडळाच्या एका विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. अध्यासी अधिकारी राजन आरविंदेकर यांच्या अध्यक्षतेखाली आणि संस्थेच्या व्यवस्थापकांच्या प्रमुख उपस्थितीत ही निवडणूक प्रक्रिया अत्यंत शांततापूर्ण वातावरणात पार पडली. गुरुवारी दुपारी ३.३० वाजल्यापासून या निवडणूक कार्यक्रमाला सुरुवात झाली होती. यामध्ये नामनिर्देशन पत्र वाटप, अर्जांची छाननी आणि अर्ज माघारी घेण्याची मुदत संपल्यानंतर गुरुनाथ शंकर पेडणेकर यांचा एकमेव अर्ज असल्यामुळे अध्यासी अधिकाऱ्यांनी त्यांच्या निवडीची अधिकृत घोषणा केली.
या महत्त्वपूर्ण निवडीसोबतच संस्थेची नवीन कार्यकारणी आणि संचालक मंडळ देखील जाहीर करण्यात आले आहे. यामध्ये अध्यक्षपदी गुरुनाथ शंकर पेडणेकर तर संचालक म्हणून अशोक वसंत बुगडे, गुंडू आत्माराम साटेलकर, नामदेव जगन्नाथ साटेलकर, संजय सखाराम पिळणकर, चंद्रशेखर सिताराम पेडणेकर, सौ. समता रमेश सुर्याजी, सौ. वैशाली विलास पटेकर, कमलाकांत परशुराम मुंडये आणि रामचंद्र आपा कोचरेकर यांचा समावेश आहे. नवनिर्वाचित अध्यक्ष गुरुनाथ पेडणेकर आणि सर्व नूतन संचालकांचे भंडारी समाज बांधवांकडून तसेच सहकार क्षेत्रातून जोरदार स्वागत व अभिनंदन होत आहे. संस्थेच्या उत्कर्षासाठी आणि प्रगतीसाठी सर्व घटकांना सोबत घेऊन अत्यंत पारदर्शक कारभार करण्याचा संकल्प याप्रसंगी नूतन अध्यक्ष श्री. पेडणेकर यांनी व्यक्त केला.










