LIVE UPDATES

कुडाळ कविलकाटे साई मंदिरात गुरुपौर्णिमा उत्साहात

भाविकांची मोठी गर्दी
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: July 29, 2026 16:02 PM
views 55  views
#kokansadlive#news update#konkan update#

कुडाळ : कुडाळ येथील कविलकाटे येथील ऐतिहासिक साई मंदिरात गुरुपौर्णिमेनिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या शतकोत्तर प्राचीन मंदिरात गोव्यापासून ते संपूर्ण महाराष्ट्रातून शेकडो भक्तगण आवर्जून हजेरी लावत असतात.

शतकोत्तर ऐतिहासिक परंपरा

हे मंदिर सुमारे १०० वर्षांपूर्वी म्हणजेच १९२२ साली स्थापन झाले असून, तेव्हापासून येथे गुरुपौर्णिमा, साईबाबा पुण्यतिथी आणि अक्षयतृतीयेला मंदिराचा वर्धापन दिन हे प्रमुख उत्सव अत्यंत उत्साहात साजरे केले जातात. या मंदिरातील साईबाबांची मूर्ती अतिशय सजीव असून, "साईबाबा प्रत्यक्ष समोरच बसले आहेत," अशी अलौकिक अनुभूती या मूर्तीचे दर्शन घेतल्यावर भक्तांना मिळते.

गुरुपौर्णिमेच्या पूर्वसंध्येपासूनच मंदिरात भाविकांची मोठी मांदियाळी पाहायला मिळाली. याविषयी माहिती देताना राजन माडये यांनी सांगितले की,पहाटेपासूनच बाबांच्या आशीर्वादासाठी भाविक रांगेत उभे होते.सकाळी ७:०० वाजता षोडशोपचार पूजा व अभिषेक संपन्न झाला, दुपारी १२:०० वाजता मध्यान आरती झाली, दुपारी १:०० वाजल्यापासून हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.

या मंदिराची महती केवळ दर्शनापुरती मर्यादित नसून, येथे एक ध्यान साधना कक्ष देखील स्थापन करण्यात आला आहे. विशेषतः गोव्यापासून अनेक साधक व भक्त येथे शांत वातावरणात ध्यान साधना करण्यासाठी आवर्जून येतात.

तसेच, गुरुपौर्णिमेनिमित्त दर्शन घेण्यासाठी व सहभागी होण्यासाठी आलेल्या भक्तांच्या मनोरंजनासाठी व आत्मिक आनंदासाठी 'विजयानंद म्युजिक क्लास' तर्फे विशेष भक्ती संगीताचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, ज्याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.