
सावंतवाडी : धान्यातली पेंढी, मातीचा सुगंध अन् प्रकाशाचा उत्सव ! कोकणातल्या मातीशी नाळ जोडलेल्या एका युवा कवीने यंदा दिवाळीत थेट शेतातील भाताच्या गवतापासून पर्यावरणपूरक आकाशकंदील तयार करत एक नवा पायंडा पाडला आहे. सावंतवाडी तालुक्यातील धाकोरे येथील युवा कवी व कलाकार सुनील मुळीक यांनी एक अत्यंत निसर्गपूरक व कल्पक पर्याय समोर आणला आहे. त्यांनी शेतातील भाताच्या गवतापासून (पेंढ्यापासून) सुटसुटीत, आकर्षक आणि १०० टक्के पर्यावरणपूरक आकाशकंदील तयार करून पर्यावरण संवर्धनाचा अत्यंत सुंदर संदेश दिला आहे.
आधुनिकतेच्या प्रवाहात सण साजरे करताना पर्यावरणाची होणारी हानी टाळण्यासाठी सुनील मुळीक यांनी ही अनोखी संकल्पना प्रत्यक्षात आणली. भातकापणीनंतर शेतात उरणाऱ्या गवताचा (पेंढ्याचा) सुयोग्य वापर करत, कोणत्याही प्लास्टिक, थर्माकोल किंवा रासायनिक घटकांशिवाय त्यांनी हे कंदील विणले आहेत. पारंपरिक कंदील कलेला निसर्गाच्या घटकांची जोड देत त्यांनी तयार केलेली ही कलाकृती दिसायला अत्यंत सुंदर, कलात्मक आणि पर्यावरणस्नेही आहे.
सिंधुदुर्गासह गोवा अन् पुण्यातून वाढती मागणी
सुनील मुळीक यांच्या या अनोख्या आणि नाविन्यपूर्ण उपक्रमाची बातमी पसरताच त्यांच्या या आकाशकंदिलांना सर्वच स्तरातून पसंती मिळत आहे. केवळ सिंधुदुर्ग जिल्ह्यातच नव्हे, तर शेजारच्या गोवा राज्यात आणि पुण्यासारख्या मेट्रो शहरांमधूनही या गवताच्या कंदिलांना मोठी मागणी नोंदवली जात आहे. निसर्गाशी नातं सांगणारे हे आकाशकंदील यंदा अनेकांच्या घरांची शोभा वाढविणार आहेत.
आपल्या या संकल्पनेविषयी बोलताना सुनील मुळीक म्हणाले, "सण-उत्सव साजरे करताना आपल्यामुळे निसर्गाला हानी पोहोचणार नाही, याची दक्षता घेणे ही आपल्या प्रत्येकाची सामाजिक व नैतिक जबाबदारी आहे. प्लास्टिकमुक्त आणि प्रदूषणमुक्त सण साजरे करण्यासाठी नैसर्गिक साहित्याचा वापर वाढला पाहिजे. या आकाशकंदिलांच्या माध्यमातून नागरिकांनी निसर्गाच्या जवळ जावे आणि पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करावी, हाच आमचा प्रयत्न आहे."
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all








