LIVE UPDATES

कुडाळमध्ये १३ ऑगस्टला भव्य पक्षविरहित तिरंगा यात्रा

सर्व देशप्रेमी नागरिकांनी यात सहभागी व्हावे : राष्ट्रप्रेमी नागरिक मंचचे आवाहन
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: August 10, 2026 18:49 PM
views 75  views

कुडाळ : तरुणांमध्ये देशप्रेमाची भावना वाढवणे आणि सर्वसामान्य नागरिकांमध्ये जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने राष्ट्रप्रेमी नागरिक मंचच्यावतीने गुरुवार, १३ ऑगस्ट रोजी सकाळी ९.३० वाजता कुडाळात भव्य तिरंगा यात्रा काढण्यात येणार आहे. ही यात्रा पूर्णपणे पक्षविरहित असून, जात, धर्म आणि राजकारणाच्या पलीकडे जाऊन सर्व देशप्रेमी नागरिकांनी यात सहभागी व्हावे, असे आवाहन यात्रेचे संयोजक विवेक पंडीत यांनी पत्रकार परिषदेत केले.

या पत्रकार परिषदेला संध्या तेरसे, रमाकांत नाईक, सुनील बांदेकर, शिवम म्हाडेश्वर आदी मान्यवर उपस्थित होते. ही तिरंगा यात्रा १३ ऑगस्ट रोजी सकाळी ९.३० वाजता भैरव मंदिर येथून सुरू होऊन एस.एन.देसाई चौक येथे समाप्त होईल. यात्रेदरम्यान देशभक्तीपर गीते वाजवली जाणार आहेत.

यावेळी पत्रकार परिषदेत माहिती देताना विवेक पंडीत म्हणाले, राष्ट्रप्रेमी नागरिक मंचच्या माध्यमातून दरमहा इतिहास अभ्यासक व संशोधक रवीराज पराडकर यांच्या व्याख्यानांच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास तरुणांपर्यंत पोहोचवला जातो. शासकीय स्तरावर निघणाऱ्या तिरंगा रॅलीच्या धर्तीवरच, सर्वसामान्य जनतेला एकत्र आणून देशप्रेमाचे वातावरण निर्माण करण्यासाठी ही यात्रा आयोजित करण्यात आली आहे. या यात्रेचा कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंध नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

 बंड्या सावंत म्हणाले की, या पक्षविरहित तिरंगा यात्रेला पालकमंत्री नितेश राणे उपस्थित राहणार आहेत. तसेच या अभियानांतर्गत १३, १४ आणि १५ ऑगस्ट दरम्यान कुडाळ परिसरातील वीर माता, वीर पत्नी आणि माजी सैनिकांच्या घरी जाऊन त्यांचा सत्कार केला जाणार आहे व सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली जाणार आहे.