
सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतपेढी मर्या.सिंधुदुर्गनगरी या संस्थेच्या रिक्त झालेल्या सर्वसाधारण सावंतवाडी तालुका संचालक पदावर भाग्यलक्ष्मी सहकार पॅनल मार्फत श्री.गोविंद गणपत शेर्लेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
संस्थेच्या सावंतवाडी तालुका सर्वसाधारण जागेवरील संचालक सेवानिवृत्त झाल्याने रिक्त झालेल्या जागेची निवड प्रक्रिया संचालक मंडळ सभेत बुधवारी ता.२१ रोजी अध्यासी अधिकारी अजय हिर्लेकर यांचे उपस्थितीत पार पडली.
यावेळी श्री.गोविंद शेर्लेकर यांचे एकमेव नामनिर्देशन प्राप्त झाल्याने अध्यासी अधिकारी यांनी त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले.यावेळी संस्थेचे अध्यक्ष सीताराम लांबर,उपाध्यक्ष महेंद्र पावसकर,सर्व संचालक तसेच संस्थेचा अधिकारी वर्ग उपस्थित होता.
निवडप्रक्रिया पार पडल्यावर भाग्यलक्ष्मी सहकार पॅनलचे व शिक्षक समितीचे राज्य सरचिटणीस राजन कोरगावकर,जिल्हाध्यक्ष विठ्ठल गवस,जिल्हा सरचिटणीस तुषार आरोसकर,राज्य पदाधिकारी दादा जांभवडेकर,सचिन मदने,राजू वजराटकर,प्रशांत मडगांवकर,जिल्हा सल्लागार नंदकुमार राणे यांसह अनेक पदाधिकारी यांनी उपस्थित राहून शेर्लेकर यांचे अभिनंदन केले.








