
कणकवली : कणकवली शहर विकास आघाडीच्या वतीने शहरातील महिला बचत गटांना तसेच स्थानिक व्यावसायिकांना आपल्या उत्पादनांच्या विक्रीसाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने २ ते ७ नोव्हेंबर या कालावधीत हा दिवाळी बाजार भरविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील, मुंबई-गोवा महामार्गावरील उड्डाणपुलाखालील जागेवर हा बाजार भरविण्यात येणार आहे. या आयोजनाच्या ठिकाणाची कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर, उपनगराध्यक्ष सुशांत नाईक यांनी गुरुवारी पाहणी केली.यावेळी उपनगराध्यक्ष सुशांत नाईक, नगरसेवक संकेत नाईक, सुनील आजगावकर आदी उपस्थित होते.
दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना आवश्यक असणाºया विविध वस्तूंची खरेदी एकाच ठिकाणी करता यावी. तसेच स्थानिक महिला बचत गट आणि लघु उद्योजकांना आपल्या उत्पादनांची विक्री करता यावी, हा या दिवाळी बाजारामागील मुख्य उद्देश आहे. शहरातील बचत गटांच्या माध्यमातून अनेक महिला विविध वस्तू तयार करून रोजगारनिर्मिती करीत आहेत. त्यांच्या कौशल्याला बाजारपेठ मिळावी आणि त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी प्रोत्साहन मिळावे, यासाठी शहर विकास आघाडीने हा उपक्रम हाती घेतला आहे. दिवाळीच्या खरेदीसाठी नागरिकांना विविध वस्तू एकाच ठिकाणी उपलब्ध व्हाव्यात आणि स्थानिक उत्पादकांना थेट ग्राहकांपर्यंत पोहोचता यावे, यासाठी बाजाराचे नियोजन केले जात आहे. या उपक्रमाला नागरिकांनी तसेच इच्छुक स्टॉलधारकांनी सहकार्य करावे, असे आवाहन श्री. पारकर यांनी केले. या बाजारात इच्छुक महिला बचत गट, स्थानिक उद्योजक आणि व्यावसायिकांनी स्टॉलसाठी नावनोंदणी लुकेश कांबळे, श्रीधर सावंत यांच्याकडे करावी, असे आवाहन श्री. पारकर यांनी केले आहे.








