LIVE UPDATES

गोवा बनावटीच्या अवैध दारू विक्रीविरोधात धडक कारवाई

Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: November 08, 2026 03:00 PM
views 104  views

मालवण : गोवा बनावटीच्या अवैध दारू विक्रीविरोधात मालवण पोलिसांची धडक कारवाई सुरूच आहे. शनिवारी धुरीवाडा येथे टाकलेल्या छाप्यात 3 लाख 45 हजार रुपये किमतीची दारू जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणी आनंद भालचंद्र मुणगेकर (रा. कोतेवाडा, मालवण) याच्यावर पोलिसांनी कारवाई केली आहे.

मालवण तालुक्यात गोवा बनावटीच्या दारूची अवैध विक्री आणि वाहतूक रोखण्यासाठी पोलिसांकडून धडक मोहीम सुरु आहे. याच मोहिमेअंतर्गत धुरीवाडा येथे अवैध दारू साठविल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईदरम्यान मोठ्या प्रमाणात गोवा बनावटीची दारू आढळून आली. पोलिसांनी सुमारे 3 लाख 45 हजार रुपये किमतीचा दारूसाठा जप्त केला. पोलीस अधीक्षक मोहन दहीकर आणि अपर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांच्या मार्गदर्शनाखाली परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक दीपक शेलार यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. या पथकात सहायक पोलीस निरीक्षक गणेश माने, पोलीस उपनिरीक्षक अभिजित भोसले, हेड कॉन्स्टेबल सुहास पांचाळ, सुप्रिया पवार आणि वृषाली पाटील यांचा समावेश होता.