LIVE UPDATES

Pramod Sawant : गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत माणगावच्या श्री दत्त चरणी नतमस्तक

‘दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा’चा नामजप; गोव्यातील जनतेच्या सुख-समृद्धीसाठी श्री दत्त महाराजांकडे प्रार्थना
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: November 02, 2026 07:24 PM
views 43  views
Goa Chief Minister Dr. Pramod Sawant offering prayers at Shri Datta Maharaj Temple in Mangaon, Kudal, Sindhudurg.

सिंधुदुर्ग : गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी कुडाळ तालुक्यातील माणगाव येथील प्रसिद्ध श्री दत्त मंदिराला भेट देत श्री दत्त महाराजांचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी ‘दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा’ असा नामजप करत मंदिरात भक्तिमय वातावरणात श्री दत्त महाराजांच्या चरणी नतमस्तक झाले.

गोव्यातील जनतेला सुखी, समाधानी आणि समृद्ध जीवन लाभावे, राज्याची भरभराट व्हावी, अशी प्रार्थना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी श्री दत्त महाराजांच्या चरणी केली. मुख्यमंत्र्यांनी मोठ्या श्रद्धेने नामस्मरण करत दर्शन घेतल्याने यावेळी उपस्थितांमध्ये भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या या मंदिर भेटीप्रसंगी श्री दत्त मंडळ ट्रस्टच्या वतीने त्यांचे स्वागत व सत्कार करण्यात आला. ट्रस्टचे अध्यक्ष सुभाष भिसे यांनी शाल व श्रीफळ देऊन मुख्यमंत्र्यांचा सन्मान केला. यावेळी भाजपचे माजी सभापती मोहन सावंत, डॉ. प्रसाद गणपत्ये, अवधूत म्हैसकर यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी माणगावच्या श्री दत्त मंदिराला भेट देत गोव्यातील जनतेच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना केल्याने या भेटीला विशेष महत्त्व प्राप्त झाले. श्री दत्त महाराजांच्या दर्शनाने आणि नामस्मरणाने मंदिर परिसरात आध्यात्मिक वातावरण अनुभवायला मिळाले.