
सावंतवाडी : आषाढी एकादशीच्या निमित्ताने सावंतवाडी नगरपरिषदेच्यावतीने 'माझी वसुंधरा' अभियानांतर्गत पर्यावरणपूरक उपक्रम राबवण्यात आला. प्रतिपंढरपूर विठ्ठल-रखुमाई मंदिर परिसरात भाविकांना तब्बल ५०० तुळशीच्या रोपांचे मोफत वाटप करून भक्तीसोबतच पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.
आषाढी एकादशीनिमित्त श्री विठ्ठल मंदिरात दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी केली होती. याप्रसंगी नगरपरिषदेच्यावतीने उपस्थित भाविकांना तुळशीची रोपे प्रदान करण्यात आली. भाविकांनी नगरपरिषदेच्या या उपक्रमाचे विशेष कौतुक केले. यावेळी सभापती सुधीर आडिवरेकर, प्रतिक बांदेकर, दिपाली भालेकर, आनंद नेवगी, नगरसेवक बाबू कुडतरकर, ॲड. सायली दुभाषी, सुनिता पेडणेकर आदींसह नगरपरिषदेचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.











