LIVE UPDATES

सावंतवाडीतील चार अल्पवयीन विद्यार्थी वैभववाडीत सापडले

Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: October 13, 2026 19:29 PM
views 36  views

वैभववाडी : सावंतवाडी येथील एका विद्यालयात नववीच्या वर्गात शिक्षण घेणारे चार अल्पवयीन विद्यार्थी मंगळवारी (ता. १३) वैभववाडी रेल्वेस्थानक परिसरात आढळून आले. रेल्वेस्थानक प्रमुखांना या विद्यार्थ्यांच्या हालचालींबाबत संशय आल्याने त्यांनी तत्काळ वैभववाडी पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी दुपारी एकच्या सुमारास चारही विद्यार्थ्यांना ताब्यात घेतले. 

याबाबत पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सावंतवाडी येथील एका विद्यालयात शिक्षण घेणाऱ्या या चार विद्यार्थ्यांपैकी दोघे सावंतवाडी तालुक्यातील, तर अन्य दोघे कुडाळ तालुक्यातील आहेत. हे चौघेही नववीच्या वर्गात शिकत आहेत. मंगळवारी सकाळी त्यांनी सावंतवाडी येथून मांडवी एक्स्प्रेसने प्रवास केला आणि वैभववाडी रेल्वेस्थानक गाठले.

स्थानकावर आल्यानंतर तेथेच बसून राहिलेल्या या विद्यार्थ्यांच्या उपस्थितीबाबत रेल्वेस्थानक प्रमुखांना संशय आला. त्यांनी वेळ न दवडता वैभववाडी पोलिसांशी संपर्क साधून या प्रकाराची माहिती दिली.माहिती मिळताच पोलीस हवालदार शैलेश कांबळे आणि पोलीस कर्मचारी समीर तांबे यांनी रेल्वेस्थानकात धाव घेतली.

पोलिसांनी या चारही विद्यार्थ्यांकडे चौकशी केली असता, आपण फिरण्यासाठी आल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, अल्पवयीन विद्यार्थी दुसऱ्या तालुक्यातून रेल्वेने वैभववाडीपर्यंत आल्याने पोलिसांनी या घटनेची गांभीर्याने दखल घेतली. त्यानंतर चौघांनाही पुढील चौकशीसाठी वैभववाडी पोलीस ठाण्यात आणण्यात आले.

पोलीस ठाण्यात आणल्यानंतर विद्यार्थ्यांच्या पालकांशी संपर्क साधून त्यांना घटनेची माहिती देण्यात आली. मुलांच्या अचानक झालेल्या या प्रवासामुळे पालकांनाही त्यांना घेण्यासाठी वैभववाडी पोलीस ठाण्यात यावे लागले. मंगळवारी सायंकाळी उशिरा चारही विद्यार्थ्यांचे पालक पोलीस ठाण्यात दाखल झाले. आवश्यक ती माहिती घेतल्यानंतर पोलिसांनी चारही विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांच्या ताब्यात दिले.

विद्यार्थ्यांच्या प्रवासाबाबत प्रश्नचिन्ह

शाळेत नववीच्या वर्गात शिकणारी चार अल्पवयीन मुले एकाच वेळी सावंतवाडीहून रेल्वेने वैभववाडीपर्यंत कशी आली आणि त्यांच्या या प्रवासामागे नेमके काय कारण होते, याबाबत परिसरात चर्चा सुरू आहे. विद्यार्थ्यांनी फिरण्यासाठी आल्याचे सांगितले असले, तरी त्यांच्या प्रवासाचा नेमका उद्देश स्पष्ट झालेला नाही.

रेल्वेस्थानक प्रमुखांच्या सतर्कतेमुळे हा प्रकार पोलिसांच्या निदर्शनास आला. त्यानंतर पोलिसांनी तातडीने कार्यवाही करून विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे त्यांच्या पालकांच्या स्वाधीन केले.