LIVE UPDATES

संभाव्य दुष्काळी परिस्थितीच्या अनुषंगाने जिल्ह्यात उपाययोजना राबवा

जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांचे निर्देश : 'ट्रिगर-१' लागू करण्याची शासनाकडे शिफारस
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: September 23, 2026 19:23 PM
views 25  views

सिंधुदुर्गनगरी : जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हास्तरीय दुष्काळ देखरेख समितीच्या बैठकीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्जन्यमान आणि संभाव्य दुष्काळी परिस्थितीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. जिल्ह्यात यंदा सरासरीच्या तुलनेत तब्बल ७०० ते ८०० मिलीमीटर पाऊस कमी झाला असून पर्जन्यमानात २५ टक्क्यांहून अधिक तूट नोंदवली गेली आहे. यामुळे संपूर्ण जिल्हा तुटीच्या पावसाच्या श्रेणीत आला असून कृषी व पिण्याच्या पाण्याच्या उपलब्धतेवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आली आहे.

महाराष्ट्र शासनाच्या जून २०१८ मधील सुधारित शासन निर्णयातील निकषांनुसार मान्सून कालावधीत ७५ टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झालेल्या किंवा प्रदीर्घ पावसाचा खंड पडलेल्या भागांत दुष्काळाची पहिली कळ म्हणजेच 'ट्रिगर-१' लागू केला जातो. या शास्त्रीय निकषांच्या आधारे जिल्ह्यातील तालुक्यांमध्ये पावसाची मोठी तूट आढळून आल्याने तेथे ट्रिगर-१ लागू करण्याची शिफारस राज्य शासनाकडे करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या अध्यक्षतेखालील आज झालेल्या बैठकीत समितीने घेतला आहे. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अपूर्वा बासूर, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. 

पर्जन्यमानाच्या या तुटीमुळे जिल्ह्यातील खरीप हंगामातील मुख्य पिकांचे विशेषतः भात आणि नाचणी पिकांचे नुकसान झाले आहे. पावसाअभावी पिकांची पाने पिवळी पडणे आणि करपणे यांसारख्या समस्या निर्माण झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर कृषी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी थेट शेतावर जाऊन शेतकऱ्यांना तांत्रिक मार्गदर्शन करावे आणि संवेदनशील वातावरण निर्माण करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी बैठकीत दिले.

शासकीय प्रक्रियेनुसार ट्रिगर-१ लागू झाल्यानंतर पुढील टप्प्यात उपग्रह निर्देशांक, मृदा आर्द्रता आणि भूजल पातळी यांसारख्या प्रभावदर्शक निर्देशांकांचे मूल्यमापन करून ट्रिगर-२ चा आढावा घेतला जाईल. त्यानंतर निवडक गावांमध्ये प्रत्यक्ष पीक पाहणी करून शासनाकडून जाहीर केलेल्या टक्केवारी पेक्षा जास्त पीक नुकसान आढळल्यास ती गावे दुष्काळ घोषित करण्यास पात्र ठरतील. या संपूर्ण मूल्यांकनाचा सविस्तर तपशील विहित प्रपत्र तयार करून अहवाल शासनाकडे पाठवण्यात येत आहे.

जिल्हा प्रशासनाला सूचना देताना जिल्हाधिकारी म्हणाल्या, दुष्काळी परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांनी पाणीटंचाई भासू नये म्हणून आधीच योग्य नियोजन करावे आणि टंचाई आराखड्यातील प्रलंबित कामे तात्काळ पूर्ण करावीत. तसेच जलसंधारण व मृद संधारणांतर्गत ग्रामीण व वन क्षेत्रात छोटे बंधारे आणि पाणी अडवण्याचे प्रकल्प प्राधान्याने मार्गी लावण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सर्व प्रशासकीय यंत्रणांनी समन्वयाने काम करून टंचाईग्रस्त भागांत पाणी व चाऱ्याची पुरेशी व्यवस्था उपलब्ध करून देण्याचे आवाहनही बैठकीत करण्यात आले.

तालुकानिहाय पर्जन्यमान तूट व परिस्थिती

सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सरासरी पर्जन्यमान २८६४.१ मिमी असून यंदा प्रत्यक्षात २११३.५ मिमी पाऊस झाल्याने संपूर्ण जिल्ह्यात एकूण -२६.२ टक्केची तूट (सरासरीच्या ७३.८ टक्के पाऊस) नोंदवली गेली आहे. तालुकानिहाय आकडेवारीनुसार, वेंगुर्ला तालुक्यात २७१४.९ मिमी सरासरीच्या तुलनेत १५५२.० मिमी पाऊस होऊन सर्वाधिक -४२.८ टक्के तूट (५७.२ टक्के पाऊस) नोंदवली गेली आहे.

त्यापाठोपाठ सावंतवाडी तालुक्यात ३६७०.९ मिमी ऐवजी २४००.६ मिमी (-३४.६ टक्के तूट; ६५.४ टक्के पाऊस), मालवण तालुक्यात २३१७.६ मिमी ऐवजी १६००.९ मिमी (-३०.९ टक्के तूट; ६९.१ टक्के पाऊस), कणकवली तालुक्यात ३२००.४ मिमी ऐवजी २३१७.५ मिमी (-२७.६ टक्के तूट; ७२.४ टक्के पाऊस), कुडाळ तालुक्यात २९३३.४ मिमी ऐवजी २१५०.० मिमी (-२६.७ टक्के तूट; ७३.३ टक्के पाऊस) आणि वैभववाडी तालुक्यात ३३४३.३ मिमी ऐवजी २५६६.१ मिमी (-२३.२ टक्के तूट; ७६.८ टक्के पाऊस) नोंद झाली असून हे सहा तालुके 'तुटीचा पाऊस' (Deficient) श्रेणीत आले आहेत.

याउलट, देवगड तालुक्यात २२९०.९ मिमी सरासरी ऐवजी १९५५.७ मिमी (-१४.६ टक्के तूट; ८५.४ टक्के पाऊस) आणि दोडामार्ग तालुक्यात ३२०९.५ मिमी सरासरी ऐवजी २६१९.६ मिमी (-१८.४ टक्के तूट; ८१.६ टक्के पाऊस) नोंद झाली असून हे दोन तालुके 'सामान्य' श्रेणीत आहेत.