
वेंगुर्ला : शेतीकडे केवळ पारंपरिक व्यवसाय म्हणून न पाहता त्यात जागतिक ज्ञान, आधुनिक तंत्रज्ञान आणि आर्थिक कल्पकतेची सांगड घालणे आवश्यक आहे. स्थानिक पातळीवर स्वावलंबन निर्माण करताना नवीकरणीय ऊर्जेचा वापर, कृषी उत्पादनांवर प्रक्रिया आणि पर्यटनाच्या माध्यमातून शेतीला नवी दिशा देता येऊ शकते. तसेच अन्नाकडे केवळ भूक भागविण्याचे साधन म्हणून न पाहता त्याचा औषध म्हणूनही विचार केला पाहिजे, असे प्रतिपादन फोमेंतो समूहाचे चेअरमन अवधूत तिंबलो यांनी वेंगुर्ले येथे केले.
डॉ. बाळासाहेब कोकण कृषी विद्यापीठाचे प्रादेशिक फळ संशोधन केंद्र वेंगुर्ला येथे आयोजित भारतीय सोसायटी ऑफ कोस्टल ॲग्रिकल्चरल रिसर्च (ISCAR) आणि डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने किनारपट्टीवरील हवामानपूरक शेती व हरित तंत्रज्ञान या विषयावर सुरू असलेल्या परिसंवादात ते प्रमुख प्रवक्ते म्हणून बोलत होते. यावेळी डॉ. बाळासाहेब कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एस. जी. भावे, युनिव्हर्सिटी ऑफ ऑक्सफर्डचे डायरेक्टर प्रो. अजित जावकर, आयएससीएआरचे अध्यक्ष डॉ. बी. माजी, आयोजक सचिव डॉ. टी. डी. लामा, स्थानिक आयोजन सचिव डॉ. एस. व्ही. सावर्डेकर, डॉ. एस. एस. नवखने, डॉ. एस. आर. तोरणे आदी उपस्थित होते.
अवधूत तिंबलो यांनी आपल्या मार्गदर्शनात शेतीला भौगोलिक सीमांमध्ये बांधून न ठेवता जगभरातील ज्ञान आणि अनुभवांचा उपयोग करण्याचे आवाहन केले. गोवा आणि कोकणात काजू, मिरची तसेच बटाट्यासारखी पिके वेगवेगळ्या काळात बाहेरून आली आणि स्थानिक शेतीचा भाग बनली. यातून शेतीमध्ये नवे प्रयोग आणि बदल स्वीकारण्याची क्षमता असल्याचे दिसून येते, असे त्यांनी सांगितले.
स्थानिक संसाधनांचा योग्य वापर करून स्वावलंबन वाढविणे, शेतीमध्ये सौर ऊर्जेसारख्या नवीकरणीय ऊर्जेचा वापर करणे आणि कृषी उत्पादनांना प्रक्रिया उद्योगाची जोड देणे गरजेचे आहे. शेतीमालाला अधिक मूल्य मिळवून देण्यासाठी उत्पादनापासून बाजारपेठेपर्यंत नव्या संधी शोधल्या पाहिजेत, असेही त्यांनी नमूद केले.
शेती आणि पर्यटन यांची सांगड घातल्यास कोकणातील ग्रामीण भागाला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याची मोठी संधी आहे. येथील निसर्ग, खाद्यसंस्कृती आणि कृषी परंपरा यांचा उपयोग करून पर्यटनाला चालना देता येईल. मात्र, विकास करताना स्थानिक वैशिष्ट्ये आणि पर्यावरणाचे जतन करणेही तितकेच महत्त्वाचे आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.
अन्न हे केवळ पोट भरण्याचे साधन नसून आरोग्याशी निगडित महत्त्वाचा घटक आहे. त्यामुळे अन्नाकडे औषध म्हणून पाहण्याची दृष्टी विकसित झाली पाहिजे. आधुनिक तंत्रज्ञान, जागतिक अनुभव आणि स्थानिक ज्ञान यांच्या एकत्रित वापरातून कोकणातील शेती अधिक सक्षम आणि शाश्वत होऊ शकते, असा विश्वास तिंबलो यांनी व्यक्त केला.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all








