
सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या हवाई कनेक्टिव्हिटी बाबत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. Fly91 या विमान कंपनीला नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर स्लॉट उपलब्ध झाला आहे. त्यामुळे चिपी विमानतळावरून नवी मुंबईसाठी विमानसेवा सुरू होण्याच्या आशा पुन्हा एकदा पल्लवित झाल्या आहेत.
सिंधुदुर्गातील चिपी विमानतळ सुरू झाल्यापासून मुंबईशी थेट हवाई जोडणीला मोठे महत्त्व आहे. सध्या मुंबईतील विमानसेवेच्या उपलब्धतेवर आणि वेळापत्रकावर प्रवाशांना अनेकदा अडचणींचा सामना करावा लागतो. अशा परिस्थितीत नवी मुंबई विमानतळाचा पर्याय सिंधुदुर्गसाठी महत्त्वपूर्ण ठरू शकतो.फ्लाय ९१ला नवी मुंबई विमानतळावर स्लॉट मिळाल्याने चिपी–नवी मुंबई मार्गाबाबतच्या चर्चांना पुन्हा वेग आला आहे. या मार्गावर नियमित विमानसेवा सुरू झाल्यास सिंधुदुर्गातील प्रवासी, पर्यटक, व्यावसायिक तसेच मुंबई–नवी मुंबई परिसरात ये-जा करणाऱ्यांना मोठा दिलासा मिळू शकतो.
नुकतीच फ्लाय91 च्या विमानाने नवी मुंबई विमानतळावर पहिले लँडिंग केले. या विमानाचे 'वॉटर कॅनन सॅल्यूट' देऊन स्वागत करण्यात आले. सध्या fly 91 ची सिंधुदुर्ग विमानतळावरून पुणे, बंगळूरु, हैद्राबाद, ही सेवा सुरु आहे. आत फ्लाय ९१ला नवी मुंबई विमानतळावर स्लॉट उपलब्ध झाल्याने आता चिपी विमानतळावरून नवी मुंबईसाठी प्रत्यक्ष सेवा कधी सुरू होते, याकडे सिंधुदुर्गवासीयांचे लक्ष लागले आहे.
यासंदर्भात नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे सीएओ सुभाष मुरिकेंचेरी यांनी सांगितले की, फ्लाय९१चे आगमन हे विमानतळाच्या वाढत्या एअरलाइन नेटवर्कमधील महत्त्वाची भर आहे. सिंधुदुर्ग, जळगाव, गोवा आणि अगात्ती ही ठिकाणे पर्यटन आणि प्रादेशिक व्यावसायिक प्रवासाच्या दृष्टीने महत्त्वाची असल्याचे त्यांनी नमूद केले. नवी मुंबईला प्रवाशांसाठी सोयीचे प्रवेशद्वार बनविण्यासाठी आणि विविध भागांमध्ये अर्थपूर्ण कनेक्टिव्हिटी निर्माण करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.












