
वैभववाडी : भुईबावडा येथील पोस्ट कार्यालयात सरकारी रकमेचा ६९ हजार ५४६ चा अपहार केल्याप्रकरणी तत्कालीन डाकसेवक संशयित संतोष श्रीकृष्ण वारंगे यांच्याविरोधात वैभववाडी पोलिस ठाण्यात फसवणूक व अपहाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी डाक निरीक्षक श्रीराम वायाळ यांनी तक्रार दिली आहे.
संशयित संतोष वारंगे हे १९९३ पासून भुईबावडा पोस्ट कार्यालयात डाकसेवक म्हणून कार्यरत होते. ६ नोव्हेंबर २०२४ रोजी तत्कालीन डाक निरीक्षक आर. एन. लिंगायत यांनी पोस्ट कार्यालयाची त्रैमासिक तपासणी केली असता सरकारी खात्यातील सुमारे १ लाख १० हजारांची तूट आढळून आली. त्यानंतर ७ नोव्हेंबर रोजी त्यांनी तपासणी अहवाल डाक निरीक्षक श्रीराम वायाळ यांच्याकडे सादर केला. या अहवालानंतर श्री. वायाळ यांनी ८ नोव्हेंबर २०२४ रोजी स्वतः पोस्ट कार्यालयाची पाहणी केली. त्यावेळी सरकारी नोंदीनुसार कार्यालयात १ लाख ३७ हजार इतकी रक्कम उपलब्ध असणे अपेक्षित होते. मात्र प्रत्यक्ष मोजणीमध्ये केवळ ६८ हजार ३५४ इतकीच रक्कम आढळली. त्यामुळे ६९ हजार ५४६ ची तूट असल्याचे स्पष्ट झाले.
या संदर्भात विचारणा केली असता संशयित संतोष वारंगे यांनी संबंधित रक्कम वैयक्तिक कारणांसाठी खर्च केल्याची कबुली दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. त्यानंतर ९ नोव्हेंबर २०२४ रोजी त्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले. या प्रकरणाची विभागीय चौकशी पूर्ण झाल्यानंतर वारंगे यांनी सरकारी निधीचा अपहार करून खात्याची फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार पोस्ट विभागाच्या जिल्हा अधीक्षकांनी पोलिसांत तक्रार दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानुसार डाक निरीक्षक श्रीराम वायाळ यांनी तक्रार दिल्यानंतर वैभववाडी पोलिसांनी संशयित संतोष वारंगे यांच्याविरोधात फसवणूक व अपहाराचे गुन्हे नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.













