
वेंगुर्ला : विकासकामांबाबतची तळमळ, निर्णयक्षम नेतृत्व आणि लोकाभिमुख भूमिका यामुळे अजितदादांनी महाराष्ट्राच्या राजकारणात एक वेगळी ओळख निर्माण केली. शेतकऱ्यांप्रती त्यांना नेहमीच कळवळा होता. आज ते आपल्यात नाही हे महाराष्ट्राचे फार मोठे दुर्दैव आहे. त्यांची आठवण कायम रहावी यासाठी वेंगुर्लात दरवर्षी प्रगतशील शेतकऱ्यांचा अजितदादा कृषी सन्मान पुरस्काराने सन्मान करण्यात येईल, असे प्रतिपादन अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश चिटणीस एम. के. गावडे यांनी वेंगुर्ले येथे केले.
कॅम्प येथील महिला औद्योगिक सहकारी काव्या कामगार संस्थेच्या सभागृहात अजित पवार यांच्या जयंतीनिमित आयोजित सेवा सप्ताहाचा समारोप शेतकरी सन्मान सोहळयाने करण्यात आला. यावेळी आयोजित विशेष कार्यक्रमात ते बोलत होते. प्रादेशिक फळ संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. रणजित देव्हारे, डॉ. प्रकाश क्षीरसागर, व्यासपीठावर अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्ष प - ज्ञाताई परब, जिल्हा उपाध्यक्ष संदीप राणे, कुडाळ तालुका अध्यक्ष आर. के. सावंत, वेंगुर्ले तालुका उपाध्यक्ष सुभाष दळवी, तालुका सरचिटणीस संतोष राऊळ, शहर अध्यक्ष सूरज परब, महिला शहर अध्यक्ष सुप्रिया परब, कृषीभूषण पुरस्कारप्राप्त प्रगतशील शेतकरी संतोष गाडगीळ आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरवात अजितदादा पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार व दीपप्रज्वलन करून झाली. तालुक्यातील प्रगतशील शेतकरी नाना गावडे, बापू नाईक व माधुरी परब यांचा सर्वप्रथम सत्कार करण्यात आला. त्यानंतर अजितदादा सन्मान पुरस्काराने प्रगतशील शेतकरी संतोष गाडगीळ व जिजामाता पुरस्कारप्राप्त प्रज्ञाताई परब यांचा मान्यवरांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला.
अजितदादा पवार यांना राजकीय वारसा लाभला असला तरी ते हाडाचे शेतकरी होते. शेतकऱ्यांच्या समस्या त्यांची दुःख त्यांना माहित होती. महिलांप्रती प्रचंड आदर असलेले हे व्यक्तीमत्व राजकारणातील खुप मोठे नाव होते. त्यांच्या अचानकच्या जाण्यामुळे महाराष्ट्रातील राजकारण व शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांच्या स्मृती जपण्यासाठी आयोजित केलेला हा कार्यक्रम खरोखरच प्रेरणादायक आहे, असे यावेळी बोलताना जिल्हा उपाध्यक्ष संदीप राणे म्हणाले.
प्रादेशिक फळ संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. ज्ञानेश्वर देव्हारे म्हणाले, हे एआयचे युग सर्वकाही देईल, पण माणसाला जगण्यासाठी आवश्यक अन्न केवळ शेतातच पिकू शकते. म्हणूनच शेती हिच शाश्वत असून नव तंत्रज्ञानाचा उपयोग करून आपण ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांनी शेतीतून आर्थिक उन्नतीचा मार्ग स्वीकारला पाहिजे. तीच खरी अजितदादांना आदरांजली ठरेल, असे ते म्हणाले.
महाराष्ट्र राज्याचे अर्थमंत्री म्हणून दादांनी प्रत्येक अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी झुकते माफ देत अनेक योजना जाहीर केल्या होत्या. त्यांनी आपल्या पदाचा उपयोग नेहमी जनहितासाठीच केला. म्हणूनच महाराष्ट्रातील वजनदार नेत्यांमध्ये ते अग्रक्रमावर होते असे यावेळी डॉ. प्रकाश क्षीरसागर म्हणाले
कोकणातील शेतकऱ्यांवर पवार घराण्याचे खुप मोठे उपकार आहेत. शरद पवार यांच्या १०० टक्के अनुदानावरील फळझाड लागवड योजनेमुळेच आपण आज समृद्धीचे दिवस बघत आहोत. अजित पवार यांच्या कार्यकतृत्वाचे कौतुक करावे तेवढेच कमी आहे. त्यांच्या नावाने दिला जाणारा पहिल्या वर्षीचा पुरस्कार आपल्याला प्राप्त झाला यामुळे धन्य झालो.असे यावेळी सत्कारमूर्ती संतोष गाडगीळ म्हणाले. प्रास्ताविक प्रज्ञाताई परब यांनी केले तर आभार तालुका उपाध्यक्ष सुभाष दळवी यांनी मानले.












