LIVE UPDATES

sindhudurg news : कुडाळच्या नामांकित शाळेत स्वच्छतागृहाशेजारी तांदळाचा साठा, एक्सपायर झालेले मसाले

शिंदे सेनेची शाळेत धडक : जिल्ह्यातील इतर शाळांचे काय? पालकांचा संतप्त सवाल
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: September 09, 2026 17:46 PM
views 91  views

कुडाळ : तालुक्यातील एका अत्यंत नामांकित विद्यालयात विद्यार्थ्यांच्या जिवाशी खेळ सुरू असल्याचा अत्यंत किळसवाणा आणि धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. शालेय पोषण आहारात चक्क मुदत संपलेले मसाले वापरले जात असून, धान्याचा साठा थेट स्वच्छतागृहाच्या शेजारी ठेवण्यात आल्याचे समोर आले आहे. या प्रकारानंतर आक्रमक झालेल्या शिंदे सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी शाळेत धडक देऊन प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले.

या शाळेत ४०० पेक्षा जास्त विद्यार्थी शिक्षण घेत असून, त्यातील दररोज सुमारे १४० मुले शालेय पोषण आहार घेतात. मात्र, या चिमुकल्यांच्या आरोग्याशी थेट खेळ खेळला जात असल्याचे पाहायला मिळाले. पोषण आहारासाठी लागणारे मसाले पूर्णपणे एक्सपायर झाले होते. एवढेच नाही तर लहान मुलांना दिला जाणारा तांदूळ अस्वच्छ अशा स्वच्छतागृहाच्या शेजारी साठवून ठेवण्यात आला होता. दुसरीकडे, शिक्षक मुलांची हजेरी घेतात, मात्र स्वतः हजेरी पटावर सही करायला विसरतात, असा भोंगळ कारभारही या वेळी उघड झाला.

घटनेची माहिती मिळताच अन्न व औषध प्रशासनाचे (FDA) अधिकारी चंदनशिवे, गट शिक्षण अधिकारी कैलास राऊत आणि उप शिक्षण अधिकारी किंजवडेकर यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली आणि निकृष्ट साहित्याचे नमुने ताब्यात घेतले. या वेळी शिंदे सेनेचे कमल ताई परुळेकर, अभिषेक गावडे, आबा धडाम, माजी नगरसेविका अश्विनीताई गावडे, प्रथमेश केळबाईकर, राजवीर पाटील, प्रथमेश कांबळी, चंदन कांबळी, संदेश सावंत यांसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

कुडाळसारख्या मध्यवर्ती अन् नामांकित शाळेत जर हा गंभीर प्रकार घडत असेल, तर जिल्ह्यातील इतर दुर्गम भागांतील शाळांमध्ये पोषण आहाराची काय परिस्थिती असू शकते, असा उद्विग्न सवाल आता उपस्थित होत आहे.

"शासनाकडून कोट्यवधी रुपयांचा निधी देऊनही जर मुलांच्या ताटात एक्सपायर झालेले अन्न आणि स्वच्छतागृहाशेजारील धान्य दिले जात असेल, तर मुलांच्या जिवाची कोणाला काहीच पर्वा उरलेली नाही का? शिक्षण आणि अन्न-औषध प्रशासनाने केवळ एका शाळेवर कारवाई करून न थांबता, जिल्ह्यातील सर्वच्या सर्व शाळांमधील पोषण आहाराची तात्काळ कसून चाचपणी करावी," अशी तीव्र मागणी पालक आणि सामान्य जनतेतून केली जात आहे.