LIVE UPDATES

तारामुंबरीत दुर्मिळ नाणी-नोटांचे प्रदर्शन

देश-विदेशातील ३०० देशांच्या नाणी, नोटा व पोस्टाच्या तिकिटांचा संग्रह ; १४ ते २५ सप्टेंबरदरम्यान आयोजन
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: September 15, 2026 13:02 PM
views 23  views
#kokansadlive#news update#konkan update#

देवगड : देवगड शहरालगतच्या तारामुंबरी गावचे सुपुत्र आणि मुंबई महानगरपालिका शाळेतील सेवानिवृत्त शिक्षक विजय हिरोजी खवळे यांच्या संकलनातून देश-विदेशातील दुर्मिळ नाणी, नोटा व पोस्टाच्या तिकिटांचे भव्य सांस्कृतिक व ऐतिहासिक प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. हे प्रदर्शन दि. १४ ते २५ सप्टेंबरदरम्यान तारामुंबरी येथील शिवबा सदन, श्री खवळे महागणपती मंदिराशेजारी, सकाळी ८ ते रात्री ८ या वेळेत विनामूल्य खुले राहणार आहे.

विजय खवळे यांनी विद्यार्थीप्रिय शिक्षक, कबड्डी प्रशिक्षक तसेच पर्यावरणप्रेमी म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. विद्यार्थ्यांमध्ये जिज्ञासा निर्माण व्हावी आणि त्यांच्या ज्ञानात भर पडावी, या उद्देशाने त्यांनी नाणी, नोटा आणि पोस्टाच्या तिकिटांचा संग्रह केला आहे. या संग्रहाच्या माध्यमातून विविध शैक्षणिक विषयांशी संबंधित सांस्कृतिक व ऐतिहासिक माहिती नागरिकांना आणि विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

या प्रदर्शनात १५ ऑगस्ट १९४७ नंतरच्या भारतातील नाणी व नोटा, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाशी संबंधित चलन, जुन्या संस्थानिक व राजांच्या काळातील नाणी, प्राचीन काळातील मौल्यवान व दुर्मिळ नाणी, ब्रिटिशकालीन टोकन व नाणी यांचा समावेश आहे. तसेच जगभरातील सुमारे ३०० देशांशी संबंधित नाणी, नोटा, पोस्टाची तिकिटे, राजचिन्हे आणि ध्वज पाहण्याची संधी मिळणार आहे.

या प्रदर्शनामुळे विद्यार्थी, अभ्यासक, इतिहासप्रेमी, गणेशभक्त तसेच कलाप्रेमींसाठी ज्ञानवर्धक पर्वणी ठरणार आहे. श्री खवळे महागणपतीचे दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या भाविकांनी शिवबा सदन येथे आयोजित या मोफत प्रदर्शनाचा आवर्जून लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजक व संयोजक विजय खवळे यांनी केले आहे.